SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

10 नोव्हेंबरनंतर राज्यात काहीतरी मोठं घडणार? रुग्णालयात भेटीला गेलेल्या प्रफुल्ल पटेलांना शरद पवारांची सूचना; अमित शाहांचाही उल्लेख

शरद पवार हे मागील काही दिवसांपासून पुण्यातील रुबी क्लिनिक येथे दाखल होते. त्यांना बुधवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 06, 2026, 06:46 AM IST | Updated: Nov 06, 2026, 06:59 AM IST
Image Credit: शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले प्रफुल्ल पटेल (फोटो सोशल मीडियावरुन साभार)
Join

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात गेले होते. या दोन्ही नेत्यांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले असून या भेटीत पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासोबतच राजकीय विषयांवरही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

अमित शाहांसोबतच्या भेटीबद्दलची माहिती घेतली

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेटीदरम्यान शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेलांकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत विचारणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांनी नुकतीच दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली होती. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, कोणते राजकीय विषय मांडण्यात आले आणि या भेटीमागील भूमिका काय होती, याबाबत पवारांनी पटेल यांच्याकडून माहिती घेतल्याचे समजते.

10 नोव्हेंबरनंतर...

विशेष म्हणजे, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय समीकरणे आणि पक्षाच्या भविष्यातील वाटचालीबाबत विविध चर्चा सुरू आहेत. अशा परिस्थितीत शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची रुग्णालयातील भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीदरम्यान शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल यांना आगामी 10 नोव्हेंबरनंतर पुन्हा एकदा एकत्र बसून चर्चा करू, अशी सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांमध्ये 10 तारखेचा उल्लेख असलेली चर्चा सुरु असल्याची रुग्णालयातील व्हिडीओही समोर आले आहेत. म्हणजेच दिवाळीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकत्र बसून चर्चा करणार असल्याचे संकेत यातून मिळत आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी दिवाळीनंतर एकत्र येणार की काय अशी चर्चा रंगली आहे. 

प्रसारमाध्यमांना पटेल यांनी काय सांगितलं?

या भेटीनंतर रुग्णालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांच्या प्रकृतीची माहिती देतानाच या भेटीदरम्यान राजकीय चर्चा झाल्या असल्या तरी कौटुंबिक नातेसंबंध असल्याने ही भेट घेतल्याचं सांगितलं. "पवार साहेबांची प्रकृती आता उत्तम असून त्यांनी नेहमीच्या शैलीत देशात आणि राज्यात सध्या काय सुरू आहे, या राजकीय घडामोडींचा आढावा घेतला आणि त्याबाबत चर्चा केली," असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. तसेच राजकीय चर्चांबद्दल विचारणा केली असता, त्यांनी या भेटीतील राजकीय चर्चांचे संकेत फेटाळून लावले. "आमचे नेहमीच कौटुंबिक संबंध राहिले आहेत आणि आम्ही दिल्लीतही नेहमी भेटत असतो," असे सांगत ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं पटेल यांनी नमूद केले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES