महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवला जाईल असाच आहे. याचं कारण म्हणजे आज राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच मोठ्या आर्थिक घोटाळ्यामध्ये अडकलेले हजारो कोटी रूपये गुंतवणूकदारांना परत मिळणार आहेत. विशेष म्हणजे हे पैसे परत मिळावे यासाठी स्वत: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पुढाकार घेतला होता.
कोणाला आणि कसले पैसे परत मिळणार?
आपण ज्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात बोलत आहोत त्यामध्ये 5 हजार 682 जणांना गुंतवणूकदार बनवून गंडा घालण्यात आला होता. या लोकांकडून तब्बल 1950 कोटी रुपये राष्ट्रीय स्पॉट एक्सचेंज लिमिटेड म्हणजेच एनएसईएल (NSEL) नावाच्या कंपनीने जमा केले. मात्र या पैशांचा कोणताही मोबदला या लोकांना परत देण्यात आला नव्हता. आज तब्बल 13 वर्षानंतर या 5 हजार 682 गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. हे पैसे गुंतवणूकदारांच्या खात्यावर थेट जमा केले जाणार असून ही गुंतवणूकदारांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे.
देश स्तरावरील घोटाळा
नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड घोटाळा 2013 मध्ये समोर आला होता. भारतातील कमोडिटी बाजारपेठेतील हा घोटाळा सुमारे ₹5600 कोटी रुपयांचं पेमेंट डिफॉल्ट झाल्याचा म्हणजेच पैसे थकवण्यासंदर्भातील आहे. आर्थिक फसवणुकीच्या या गैरव्यवहाराचा फटका देशभरातील सुमारे 13 हजार गुंतवणूकदारांना बसला. यामध्ये महाराष्ट्रातील हजारो गुंतवणुदारांचाही समावेश होता.
घोटाळा करणारी कंपनी कोणती? तिचा उद्देश काय होता?
'एनएसईएल'ची सुरुवात 2008 साली भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक कमोडिटी स्पॉट एक्सचेंज म्हणून झाली होती. यामध्ये जिग्नेश शाह यांच्या नेतृत्वाखालील 'फायनान्शियल टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड'चा (एफटीआयएल - आताचे 63 मुन्स टेक्नोलॉजिस) 99.99% वाटा होता, तर उर्वरित 0.01% हिस्सा 'नाफेड' (नएनएएफईडी) या सरकारी संस्थेकडे होता. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना कृषी मालाची थेट खरेदी-विक्री म्हणजेच स्पॉट ट्रेडींग करता यावी, हा या प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश होता.
घोटाळा कसा केला?
नियमांनुसार स्पॉट एक्सचेंजवर मालाची प्रत्यक्ष डिलिव्हरी होणे आणि व्यवहार 11 दिवसांच्या आत पूर्ण होणे बंधनकारक होते. मात्र, 'एनएसईएल'ने 'पेअर्ड कॉन्ट्रॅक्ट्स' सुरू केले, ज्यात गुंतवणूकदार एकाच वेळी अल्प मुदतीचा खरेदी करार आणि दीर्घ मुदतीचा विक्री करार करायचे. या करारांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना वार्षिक 14% ते 16% इतका खात्रीशीर परतावा देण्याचे आमिष दाखवले गेले. प्रत्यक्षात हा कमोडिटी व्यापार नसून कर्ज देण्या-घेण्याचा बेकायदेशीर प्रकार होता. गुंतवणूकदारांकडून गोळा केलेला पैसा 24 निवडक कर्जदार कंपन्यांना देण्यात आला. या व्यवहारांमागे गोदामांमध्ये कृषी मालाचा साठा असल्याच्या बनावट पावत्या दाखवल्या गेल्या, पण प्रत्यक्षात गोदामांमध्ये मालच नव्हता किंवा तो एकाच वेळी अनेक ठिकाणी गहाण ठेवल्याचं दाखवण्यात आलं.
भांडाफोड कसा झाला?
जुलै 2013 मध्ये केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने 'एनएसईएल'ला नियमांचे उल्लंघन करणारे नवीन करार थांबवण्याचे आणि जुने व्यवहार निकाली काढण्याचे आदेश दिले. नवीन गुंतवणूक येणे थांबताच पैशांची ही साखळी तुटली. 31 जुलै 2013 रोजी 'एनएसईएल'ने व्यवहार स्थगित केले आणि 24 कर्जदार कंपन्यांनी गुंतवणूकदारांचे सुमारे ₹5,600 कोटी रुपये थकवल्याचे उघड झाले.
अटक, जामीन अन् कोर्टाचे आदेश
या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा, सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या यंत्रणांनी केला आहे. जिग्नेश शाह यांच्यासह अनेक संचालक आणि थकबाकीदारांना अटक करण्यात आली होती. सध्या ते जामिनावर आहेत. गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी एमपीआयडी कायदा आणि मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत (एमपीएलएअंतर्गत) दोषींची हजारो कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. न्यायालयाने जप्त केलेल्या मालमत्तेचे लिलाव तसेच रोखीकरण करण्यास आणि 5682 पात्र गुंतवणूकदारांना ₹1,950 कोटी रुपयांची एकरकमी सेटलमेंट रक्कम वाटप करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसारच आज ही रक्कम गुंतवणूकदारांना परत केली जात आहे. तब्बल 13 वर्ष हा एवढा पैसा अडकून होता. आता हे पैसे गुंतवणूकदारांना परत मिळणार असल्याने गुंतवणूकादारांकडून समाधान व्यक्त होताना दिसत आहे.