राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून अनेकदा विरोधकांकडून राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसतात. मात्र नुकत्याच झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदाराने थेट राज्याचा गृहमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली जात आहे. आपण गृहमंत्री झालो तर काय करू याबद्दल या खासदाराने जाहीर सभेत केलेल्या विधानांची सध्या चांगलीच चर्चा त्याच्या मतदारसंघात रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
हा खासदार कोण?
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील गटाने बाजी मारली आणि निलेश लंके बँकेचे संचालक झाले आहेत. याच यशानिमित्त निलेश लंके यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये भाषण देताना लंके यांनी राज्याचा गृहमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली. इतक्यावरच न थांबता त्यांनी 2029 सालातील निवडणुकींसंदर्भातही भाष्य केलं आहे.
नेमकं काय म्हटलं या खासदाराने?
सत्कार स्वीकारल्यानंतर मंचावरून भाषण देताना लंके यांनी, "अहिल्यानगर जिल्ह्यात आमच्या कार्यकर्त्यांना पोलीस खूप त्रास द्यायचे. मी म्हटलं, एकदा आमचं सरकार येऊ द्या, आमच्या पक्षाने सहा महिने मला पालकमंत्री करावं आणि सहा महिने गृहमंत्री करावं. नाही सगळ्यांच्या बत्त्या गुल केल्या ना तर बघा," असं विधान केलं. एवढ्यावरच न थांबताना पुढे लंके यांनी, "भविष्यात मविआचे सरकार आल्यावर जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायला आवडेल," अशी इच्छा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासमोर व्यक्त केली. पालकमंत्री केल्यावर केवळ शिर्डीला दोन चक्कर मारून दिल्या आणि नंतर पद काढून घेतलं तरी हरकत नाही असं देखील निलेश लंके यांनी म्हटलं.
सभागृहात एकच हशा
"गृहमंत्री केलं नाही तरी चालेल पण पालकमंत्री तरी करा एकदा. सायरन वाजवीत गाडी शिर्डीकडे गेली आणि शिर्डीकडून पुन्हा नगरला आली तरी खूप झालं," असं निलेश लंके यांनी म्हटलं. निलेश लंकेंचं हे विधान ऐकून सभागृहात एकच हशा पिकला. "माझ्या गाडीच्या मागे लाल दिव्याच्या गाड्या, पुढे लाल दिव्याच्या गाड्या आणि जिल्हाधिकारी डायरी घेऊन माझ्या मागे-पुढे एवढे जरी झालं तरी खूप झालं," असंही लंके म्हणाले.
2029 चं भाकित
2029 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार राज्यात येईल असा विश्वास देखील लंके यांनी बोलून दाखवला. "2029 ला आपलं जुळेल असं मला वाटतं," असं सूचक विधान लंके यांनी केलं.