SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

₹1950 कोटी आज डायरेक्ट खात्यावर होणार जमा; फडणवीसांनी पुढाकार घेतल्याने 13 वर्षांनंतर मोठा दिलासा! नेमकं प्रकरण काय?

2013 साली उघडकीस आलेला हा सारा गैरव्यवहार 2008 साली स्थापन झालेल्या कंपनीने केला होता. मागील 13 वर्षांपासून गुंतवणूकदारांकडून पैसे परत मिळवण्यासाठी लढा सुरु होता. नेमका हा घोटाळा काय जाणून घ्या...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 23, 2026, 10:22 IST | Updated: Nov 23, 2026, 10:36 IST
Image Credit: महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं होणार (प्रातिनिधिक फोटो)
Join

महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवला जाईल असाच आहे. याचं कारण म्हणजे आज राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच मोठ्या आर्थिक घोटाळ्यामध्ये अडकलेले हजारो कोटी रूपये गुंतवणूकदारांना परत मिळणार आहेत. विशेष म्हणजे हे पैसे परत मिळावे यासाठी स्वत: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पुढाकार घेतला होता.

कोणाला आणि कसले पैसे परत मिळणार?

आपण ज्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात बोलत आहोत त्यामध्ये 5 हजार 682 जणांना गुंतवणूकदार बनवून गंडा घालण्यात आला होता. या लोकांकडून तब्बल 1950 कोटी रुपये राष्ट्रीय स्पॉट एक्सचेंज लिमिटेड म्हणजेच एनएसईएल (NSEL) नावाच्या कंपनीने जमा केले. मात्र या पैशांचा कोणताही मोबदला या लोकांना परत देण्यात आला नव्हता. आज तब्बल 13 वर्षानंतर या 5 हजार 682 गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. हे पैसे गुंतवणूकदारांच्या खात्यावर थेट जमा केले जाणार असून ही गुंतवणूकदारांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे.

देश स्तरावरील घोटाळा

नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड घोटाळा 2013 मध्ये समोर आला होता. भारतातील कमोडिटी बाजारपेठेतील हा घोटाळा सुमारे ₹5600 कोटी रुपयांचं पेमेंट डिफॉल्ट झाल्याचा म्हणजेच पैसे थकवण्यासंदर्भातील आहे. आर्थिक फसवणुकीच्या या गैरव्यवहाराचा फटका देशभरातील सुमारे 13 हजार गुंतवणूकदारांना बसला. यामध्ये महाराष्ट्रातील हजारो गुंतवणुदारांचाही समावेश होता.

घोटाळा करणारी कंपनी कोणती? तिचा उद्देश काय होता?

'एनएसईएल'ची सुरुवात 2008 साली भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक कमोडिटी स्पॉट एक्सचेंज म्हणून झाली होती. यामध्ये जिग्नेश शाह यांच्या नेतृत्वाखालील 'फायनान्शियल टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड'चा (एफटीआयएल - आताचे 63 मुन्स टेक्नोलॉजिस) 99.99% वाटा होता, तर उर्वरित 0.01% हिस्सा 'नाफेड' (नएनएएफईडी) या सरकारी संस्थेकडे होता.  शेतकरी आणि व्यापाऱ्यांना कृषी मालाची थेट खरेदी-विक्री म्हणजेच स्पॉट ट्रेडींग करता यावी, हा या प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश होता.

घोटाळा कसा केला?

नियमांनुसार स्पॉट एक्सचेंजवर मालाची प्रत्यक्ष डिलिव्हरी होणे आणि व्यवहार 11 दिवसांच्या आत पूर्ण होणे बंधनकारक होते. मात्र, 'एनएसईएल'ने 'पेअर्ड कॉन्ट्रॅक्ट्स' सुरू केले, ज्यात गुंतवणूकदार एकाच वेळी अल्प मुदतीचा खरेदी करार आणि दीर्घ मुदतीचा विक्री करार करायचे. या करारांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना वार्षिक 14% ते 16% इतका खात्रीशीर परतावा देण्याचे आमिष दाखवले गेले. प्रत्यक्षात हा कमोडिटी व्यापार नसून कर्ज देण्या-घेण्याचा बेकायदेशीर प्रकार होता. गुंतवणूकदारांकडून गोळा केलेला पैसा 24 निवडक कर्जदार कंपन्यांना देण्यात आला. या व्यवहारांमागे गोदामांमध्ये कृषी मालाचा साठा असल्याच्या बनावट पावत्या दाखवल्या गेल्या, पण प्रत्यक्षात गोदामांमध्ये मालच नव्हता किंवा तो एकाच वेळी अनेक ठिकाणी गहाण ठेवल्याचं दाखवण्यात आलं.

भांडाफोड कसा झाला?

जुलै 2013 मध्ये केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने 'एनएसईएल'ला नियमांचे उल्लंघन करणारे नवीन करार थांबवण्याचे आणि जुने व्यवहार निकाली काढण्याचे आदेश दिले. नवीन गुंतवणूक येणे थांबताच पैशांची ही साखळी तुटली. 31 जुलै 2013 रोजी 'एनएसईएल'ने व्यवहार स्थगित केले आणि 24 कर्जदार कंपन्यांनी गुंतवणूकदारांचे सुमारे ₹5,600 कोटी रुपये थकवल्याचे उघड झाले.

अटक, जामीन अन् कोर्टाचे आदेश

या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा, सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या यंत्रणांनी केला आहे. जिग्नेश शाह यांच्यासह अनेक संचालक आणि थकबाकीदारांना अटक करण्यात आली होती. सध्या ते जामिनावर आहेत. गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी एमपीआयडी कायदा आणि मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत (एमपीएलएअंतर्गत) दोषींची हजारो कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. न्यायालयाने जप्त केलेल्या मालमत्तेचे लिलाव तसेच रोखीकरण करण्यास आणि 5682 पात्र गुंतवणूकदारांना ₹1,950 कोटी रुपयांची एकरकमी सेटलमेंट रक्कम वाटप करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसारच आज ही रक्कम गुंतवणूकदारांना परत केली जात आहे. तब्बल 13 वर्ष हा एवढा पैसा अडकून होता. आता हे पैसे गुंतवणूकदारांना परत मिळणार असल्याने गुंतवणूकादारांकडून समाधान व्यक्त होताना दिसत आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES