'देवेंद्र फडणवीसांना संपवण्यासाठी जरांगेला कोण कोण ताकद...'; प्रवीण दरेकरांकडून रामदास कदमांवर पलटवार
मनोज जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपवरुन महाराष्ट्रातील नेते एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत आहेत. रामदास कदम यांनी भाजपवर लक्ष्य केल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिप बॉम्बमुळे महाराष्ट्रातील राजकारण तापलं असून सत्ताधारी पक्षातील नेते एकमेकांवर पलटवार करत आहेत. जरांगेंच्या आरोपांना उत्तर देताना शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी भाजपवर लक्ष्य केलं. प्रसाद लाड यांच्या फोटो दाखवत त्यांनी गंभीर आरोप केला. शिवाय त्यांनी प्रवीण दरेकरांचंही नाव घेतल. त्यानंतर भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी कदमांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.
प्रवीण दरेकर काय म्हणालेत?
पत्रकार परिषद घेत प्रवीण दरेकरांनी रामदास कदमांना इशारा दिला. ते म्हणाले की, तुम्हाला जसा तुमच्या नेत्याचा आदर सन्मान आहे, आम्हाला आमच्या नेत्याचा आणि पक्षाचा आदर - सन्मान आहे. आमची नावं आली आम्ही काय घाबरून काही केलं आहे. त्यावेळला मराठा समाजाच्या मागण्यासाठी मनोज जरांगे आंदोलन करत होते. आमचं तेव्हा समर्थन होतं, आजही आहे आणि उद्याही राहिल. पण ज्यावेळला देवेंद्र फडणवीस साहेबांना व्यक्तिगत टीका व्हायला लागल्यात, तेव्हा आम्ही प्रतिक्रिया दिली. मग आम्ही असं म्हणायचं का पदरामागे राहून जरांगेला ताकद देणारे कोण होत, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेतून उचलला आहे.
भारतीय जनता पार्टीला दोष देणार असाल तर...
ते पुढे म्हणाले की, तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अंगावर सोडायला, देवेंद्र साहेबांना बदनाम करायला तेव्हा कोण कोण होतं, कोणी कोणी काय काय केलं आहे, हे सुद्धा पुढे येईल. पण मला वाटतं एखाद्या जबाबदार ज्येष्ठ नेत्याने अशा प्रकारचं आपल्या नेतृत्त्वाला खूष करण्यासाठी, आपल्या मुलाचं मंत्रीपद सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा आणखी प्रमोशन मिळण्यासाठी त्यांनी त्याठिकाणी बोलावं आमचं त्यासाठी काही हरकत नाही. पण भारतीय जनता पार्टीला दोष देणार असाल तर खपवून घेणार नाही. तुम्ही जसे कडक आक्रमक बोलता आम्हाला वागता येतं आम्हालाही बोलता येतं. रामदास कदम यांनी सांगावं की भाजपच्या कुठल्या नेत्याने विडा उचलला आहे ते.
त्यांच्याविरोधात कटकारस्थान झाले...
ते पुढे म्हणाले की, तुम्ही सांगता मराठा समाजाच्या नेत्याला संपवण्याचा कट भाजपच्या नेत्याला हाताशी घेऊन करत आहात. आम्ही म्हणायचं का देवेंद्र फडणवीस यांना संपवण्यासाठी जरांगेला कोण कोण ताकद देत होतं. त्यामुळे मला वाटतं आपण एका घरात राहतो, एका घरात नांदतो तर आपण सभ्यता संस्कृतपणा राखला पाहिजे. फडणवीस यांच्यावर आरोप झालेत, त्यांच्याविरोधात कटकारस्थान झाले, त्याचं स्वागत आहे का? आता त्याठिकाणी आपल्या नेत्यावर टीका झाल्यावर बोलणं स्वाभाविक आहे. तुम्ही बोला पण मी सांगतो की चौकशी झाली पाहिजे. जे असतील त्यांच्यावर कारवाई करा. पण भाजप जबाबदार आहे, भाजप षडयंत्र करतो, हे बोलणं बंद करा. त्या टीकांचीही आम्ही चौकशीची मागणी करु.