अन्न व औषध प्रशासन एफडीएने महाराष्ट्रात धडक मोहिम सुरू केली आहे. हॉटेल, रेस्तराँमधील अस्वच्छता असो किंवा अन्नभेसळ याविरोधात मोठी पावलं उचलली आहेत. एफडीएने अनेक बड्या हॉटेलवर कारवाई करत परवाने निलंबित केले आहेत. त्यामुळं ग्राहकही आता बाहेरचं अन्न खाताना धास्तावले आहेत. मात्र आता मुंबई महानगरपालिका लवकरच एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आता हॉटेल, रेस्तराँमध्ये गेल्यानंतर किचनमध्ये तुम्ही ऑर्डर केलेला पदार्थ कसा शिजतोय, हे तुम्हाला लाइव्ह पाहता येणार आहे.
मुंबईतील रहिवाशांच्या आरोग्यासाठी मुंबई महानगरपालिका मोठा निर्णय घेऊ शकते. मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये लाईव्ह किचन स्क्रीनींग बंधनकारक करा, अशा सूचना बीएमसी ठरावात दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नगरसेवक अजित रावराणे यांची ठरावाच्या सूचनेद्वारे मागणी केली होती. तसंच, एफएसएसएआयच्या अन्नसुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावरही त्यांनी भर दिला.
मुंबईतील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांमध्ये लाईव्ह किचन स्क्रीन बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्राहकांना सहज दिसेल अशा ठिकाणी स्क्रीन बसवून स्वयंपाकघरातील कामकाज थेट दाखवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यानुसार, हॉटेल किंवा रेस्तराँमधील स्वयंपाकघरातील स्वच्छता, अन्नपदार्थांची हाताळणी आणि कर्मचाऱ्यांकडून पाळल्या जाणाऱ्या स्वच्छतेच्या नियमांवर लक्ष राहण्यास मदत होईल. तसंच, अन्नपदार्थांची साठवणूक, भांडी आणि उपकरणांची स्वच्छता तसेच अन्नसुरक्षा नियमांचे पालन याबाबत ग्राहकांना पारदर्शक माहिती मिळेल, हा यामागचा उद्देश होता.
अनेक खाद्य आस्थापनांच्या स्वयंपाकघरात अस्वच्छता, अन्नपदार्थांची अयोग्य हाताळणी आणि साठवणुकीबाबत तक्रारी होत असल्याचा दावा करण्यात येत होता. नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत पारदर्शकता निर्माण करण्यासाठी उपक्रम राबवण्याची मागणी सातत्याने होत आहे.
राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) भ्रामक दावे करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करून तयार केलेल्या सौंदर्यप्रसाधनांविरोधात मोहीम उघडली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड, मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट आणि कांदिवली येथील तीन स्वतंत्र कारवायांत 34 लाख 61 हजार 357 रुपये किमतीची सौंदर्यप्रसाधने, कच्चा माल आणि उत्पादनासाठी वापरण्यात येणारे घटक यांचा साठा जप्त करण्यात आला आहे.