अभिनेत्री दिया मिर्झा हिचा प्रदूषणविरोधी जनजागृतीपर व्हिडीओ मुंबई महापालिकेच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हटवण्यात आल्याचा वाद आता महापालिकेच्या महासभेत पोहोचलाय. मुंबई उच्च न्यायालयाने व्हिडीओ पुन्हा अपलोड करण्याचे निर्देश देऊनही तो अद्याप प्रसारित का करण्यात आला नाही, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या महासभेत या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. याचवेळी दिवाळीत फटाक्यांमुळे लागलेल्या आगी आणि अग्निशमन दलाच्या कामकाजावरही चर्चा झाली. काय घडलं नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
मुंबई महापालिकेने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वायू आणि ध्वनिप्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी काही प्रसिद्ध व्यक्तींचे व्हिडीओ तयार केले होते. त्यामध्ये दिया मिर्झाचाही समावेश होता. मात्र, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी तिच्या सहभागावर आक्षेप घेतल्यानंतर महापालिकेने हा व्हिडीओ सोशल मीडिया अकाउंटवरून हटवला. त्यानंतर 3 नोव्हेंबरला मुंबई उच्च न्यायालयाने व्हिडीओ पुन्हा अपलोड करण्याचे निर्देश दिले. तरीही तो पुन्हा प्रसारित न झाल्याने महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी महासभेत हरकतीचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारला. महापालिकेने स्वतःहून दिया मिर्झाकडून जनजागृतीचा व्हिडीओ तयार करून घेतला होता. मग तो नेमका कोणाच्या आदेशाने हटवण्यात आला? न्यायालयाने पुन्हा अपलोड करण्याचे निर्देश दिल्यानंतरही प्रशासनाने त्याची अंमलबजावणी का केली नाही? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. या प्रकरणात मुंबईकरांना स्पष्टीकरण मिळाले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
ठाकरेंच्या शिवसेना पक्षाच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनीही प्रशासनावर टीका केली. दिया मिर्झाने कोणतेही मानधन न घेता जनजागृतीसाठी व्हिडीओ तयार केला होता. मात्र तिचा व्हिडीओ हटवून महापालिकेने तिचा अपमान केला आणि संस्थेची प्रतिमा मलिन केली, असा आरोप त्यांनी केला. न्यायालयाच्या आदेशानंतरही प्रशासनाकडून स्पष्ट उत्तर मिळत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सभागृह नेते गणेश खणकर यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले. दिया मिर्झाच्या व्हिडीओला धर्म किंवा जात पाहून विरोध करण्यात आलेला नाही, तर मुंबईच्या विकासासंदर्भात तिने घेतलेल्या भूमिकांवर आक्षेप असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवीण छेडा आणि प्रकाश दरेकर यांनीही हिंदूंच्या अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांना प्रत्युत्तर दिले. भाजप नगरसेवक विक्रम राजपूत यांच्या किशोरी पेडणेकर यांच्या भाषणावरील टिप्पणीमुळे वातावरण आणखी तापले. शिवसेना (ठाकरे), मनसे, काँग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी केली.
दिवाळीत फटाक्यांमुळे मुंबईत लागलेल्या आगींच्या घटनांवरही महासभेत चर्चा झाली. काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी अग्निशमन दलाला काही ठिकाणी घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाला वेळेत पोहोचता येत नसेल, तर त्यामागील कारणांचा आढावा घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे दिया मिर्झाच्या व्हिडीओचा वाद आणि शहरातील प्रदूषण व अग्निसुरक्षेचा प्रश्न या दोन्ही मुद्द्यांवरून महासभेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला.