...म्हणजे महाराष्ट्रविरोधी धोरण; कर्जत वृक्षतोडीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 2 शब्दात पहिली प्रतिक्रिया
भीमाशंकर अभयारण्यात बेसुमार वृक्षतोडसंदर्भात विरोधकांकडून टीका होत असताना मुख्यमंत्र्यांनी दोन शब्दात पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भीमाशंकर अभयारण्यात बेसुमार वृक्षतोडसंदर्भात विरोधक आक्रमक झाले आहेत. या परिसरात टोरेंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं आहे. नवी मुंबईतील महापेत इंडिया ज्वेलरी पार्कच्या भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी भीमाशंकर अभयारण्यात बेसुमार वृक्षतोडवरून जो वाद सुरू आहे, त्यावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
कर्जतच्या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री दोन शब्दात म्हणालेत...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पहिली गोष्ट फेक नरेटिव्हशिवाय याला काही म्हणता येणार नाही. आपल्याकडे पंप स्टोरेज म्हणजे हायडल पॉवर ही क्लिन पॉवर म्हणजे स्वच्छ पॉवर आहे. प्रदूषण न करणारी ही उर्जा आहे. आज आपण विचार केला तर जास्त क्षमता आपण सोलारची आपण तयार केली आहे.पण आपला पिक अवर सोलारच्या नंतर असतो म्हणजे पाच वाजेनंतर सोलरची वीज मिळत नाही. आणि मग तो जो पीक अवर चार तासांचा आहे. याकरता जर कोळशाची वीज आपण वापरली तर मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. आणि म्हणून पंप स्टोरेजच्या माध्यमातून क्लीन एनर्जी ही वापरण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पंप स्टोरेजचा हब झालेला आहे. त्यातलाच हा एक प्रकल्प आहे. की ज्याच्यामध्ये 3000 मेगावट वीज तयार होणार आहे. ही पूर्णपणे क्लीन एनर्जी आहे आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे. जी जागा घेतलेली आहे ती कशा करता घेतली आहे. त्या ठिकाणी रिझर्वायर तयार होणार आहे. तलाव तयार होणार आहे. पाण्याची साठवणूक होणार आहे. जसं आपण धरण तयार करतो तशी धरणा करता जी जागा आहे. त्याच्या बदल्यामध्ये जवळपास तीन पट जागा कंपनीने वनविभागाला दिलेली आहे. वनविभाग कंपनीच्या खर्चाने त्या ठिकाणी 30 हजार झाडं आणि 60 हजार झाडं या साइटवर अशी 90 हजार झाडं लावणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ही 3000 मेगावट वीज जी क्लीन पॉवर आपल्याला मिळतेय ही जर मिळाली नाही तर आपण कुठली पॉवर घेऊ कोळशाची म्हणजे थर्मल पॉवर आता म्हणजे 3000 मेगावट थर्मल पॉवर करता त्यातलं जे प्रदूषण तयार होतं. ते प्रदूषण मिटगेट करायचं असेल 28 कोटी झाडं लावावी लागेल. फूल ग्रोन 28 कोटी झाडं जर ते प्रदूषण कमी करायचं असेल.
दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण जर एकूण 3 हजार मेगावॅटमधून थर्मल पॉवर मधून किती प्रदूषण होतं 40 लाख गाड्या जेवढं प्रदूषण करतील तेवढं प्रदूषण यातून होईल. त्यामुळे आपण क्लिन एनर्जीचा प्रकल्प आणतो आहोत. तिसरं गोष्ट म्हणजे जर ही वीज आपण थर्मल घेतली तर किती पाणी लागतं आपल्याला 19 अब्ज घनफूट म्हणजे जवळपास चार लाख लोकांना पुरेल इतकं पाणी हे वीजेसाठी वर्षाला आपल्याला त्या ठिकाणी वापराव लागणार आहे. ते पाणीही या प्रकल्पात वाचणार आहे. एकूण आपण म्हटलं तर इतका पर्यावरणपूरक हा प्रकल्प आहे. भीमाशंकर जंगलापासून प्रकल्प 16 किमी अंतर दूर आहे. आणि भीमाशंकर मंदिरापासून प्रकल्प 20 किमी अंतर दूर आहे. दुसरं सगळी गुंतवणूक महाराष्ट्रातून आहे, रोजगार महाराष्ट्रात आहे आणि ऊर्जेवरही ही पहिला अधिकार महाराष्ट्राचा आहे.
पुढे ते म्हणाले की, पण जाणीवपूर्वक खोटा नरेटिव्ह तयार करायचा जे काम चाललेल आहे हे महाराष्ट्र विरोधी काम आहे. कायद्याच्या चौकटीतून 18 महिने सुनावणीनंतर हा प्रकल्प मंजूर झाला आहे. पण जर ग्रामस्थांचं म्हणणं असेल ते ऐकून घेतलं जाईल आणि त्याच्यावर मार्ग काढण्याच येईल. कारण हा प्रकल्पच समाजासाठी होतोय. त्यामुळे समजाचा कुठलाही वर्ग वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जणार आहे. पण केवळ राजकारणाकरता फेक नरेटिव्ह करुन महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने येणारी क्लीन एनर्जी ही थांबवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते मात्र योग्य नाही.