कार्टूनिस्ट अलोक निर्मित पु. ल. देशपांडे दिनदर्शिका 2027 चे प्रकाशन आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या सोहळ्यात त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. तर बाळासाहेबांच्या व्यंगचित्राबद्दलही ते भरभरून बोलले. पण त्यासोबत राज ठाकरे यांनी काँग्रेसपासून भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
यावेळी भाषण करताना राज ठाकरे म्हणाले की, जेव्हा मी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाकडे बघतो, सत्ता येऊन चालत नाही, सत्तेवर बसून चालत नाही. सत्ता अंगात आणि मनात असावी लागते. भाजप अजून विरोधीपक्ष भूमिकेतून बाहेर आलेला नाही. तर काँग्रेसला अजून समजला नाहीय की, विरोधपक्ष कसा असतो. गेल्या पाच वर्षात जरा त्यांना लक्षात आलं आहे. पण मला असं वाटतं की, ही गोष्ट योग्य नाही. आपल्यावरचा विरोध आपल्यावरची टीका, ही समजून घेतली पाहिजे. ते काय काल भाजपने तो संविधान वाचवा मोर्चा काढला. हे सत्तेवरती आहेत. सत्तेवरचा पक्ष मोर्चा काढतो लोकशाही वाचवा. काल एका माणसाने फार चांगली कमेंट केली होती. तो म्हणाला की, भारतीय जनता पक्षाने लोकशाही वाचवावी असं सांगणं, कंट्री फ्राइड (KFC) चिकन विकणाऱ्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखा आहे. प्रश्न असा आहे की, तुम्ही सत्तेमध्ये आहात तुम्ही कसले मोर्चे काढत आहात. का काढत आहे, कशासाठी काढत आहेत.
पुढे ते म्हणाले की, परवा काय ते विधान परिषदेच्या निवडणुका झाल्यात. कुठे महाराष्ट्रात झाल्या कुठे उत्तर प्रदेशात झाल्यात अजून कुठे झाल्यात. पहिले चुकीचं सांगण्यात आलं, काँग्रेसची एकही जागा आली नाही. सगळीकडे काय तो भाजपचा विजय झाला. याच्यावरती पंतप्रधान ट्वीट करतात. विधान परीषदेच्या जागा आहेत, मला आजपर्यंत आठवत नाही, इतके पंतप्रधान होऊन गेलेत, ज्यांनी अशा प्रकारच्या कुठल्या निवडणुकीवर प्रतिक्रियासुद्धा दिली आहे ते. समजा तेव्हा सोशल मीडिया नसेल पण वर्तमानपत्रातही प्रतिक्रिया दिसली नाही मला कधी. पण हे लोक अजून विरोधीपक्ष भूमिकेतूनच बाहेर पडले नाहीय.
हल्ली आमच्या व्यंगचित्र काढायची नाहीत, हे असं छाप्याच नाही, असे सगळं खूप घाणेरडे झालं आहे. एका काळात बाळासाहेब यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांची भरपूर व्यंगचित्र काढली होती. एवढंच नाहीतर एक व्यंगचित्र त्यांनी पंडितजींना पाठवलं देखील होतं. त्यावर नेहरूंनी सही करून बाळासाहेबांना शुभेच्छा दिल्या होत्या.