'...तर हा असला प्रकार तुम्ही केला नसता', 'गोकुळ' वादावर राज ठाकरे स्पष्टच बोलले; 'भाजपविरोधात सतेज पाटील...'
गुरुवारी उद्धव ठाकरेंनी फोन करुन सतेज पाटलांना फोन केला होता. त्यानंतर आज राज ठाकरेंनी उघडपणे सतेज पाटलांचं समर्थन करत भाजपावर निशाणा साधला आहे. नेमकं काय म्हणालेत राज ठाकरे जाणून घ्या...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (4 नोव्हेंबर रोजी) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच 'गोकुळ'मधील अध्यक्ष पदाचा तिढा सोडवण्यासाठी 4 शासकीय संचालक नियुक्त करण्याच्या निर्णयाचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली 'समविचारी आघाडी'ला इथं निवडून 13 सदस्यांच्या जोरावर संचालक निवडणं कठीण होणार आहे. दुसरीकडे या चार संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यात आल्याने महायुतीचे 12 सदस्य असल्याने अध्यक्ष निवडताना फेरफार होण्याची भीती काँग्रेसला वाटत आहे. यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपाठोपाठ त्यांचे धाकटे चुलत बंधू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही सतेज पाटलांना पाठिंबा दर्शवला आहे. राज यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे.
काय सिद्ध करताय तुम्ही?
राज ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीकडून सत्तेत असताना लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढले जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आलं आहे. तसेच लोकशाही वाचवण्यासाठी मोर्च काढतानाच गोकुळमध्ये मात्र विरुद्ध प्रकार दिसून येत असल्याचा टोला राज यांनी लगावला आहे. "भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष आहे. जो खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे तरीही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहे. हे जगातील एकमेव उदाहरण असेल जिथे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढतो," असं राज पोस्टच्या सुरुवातीला म्हणाले आहेत. पुढे त्यांनी 'गोकुळ'च्या मुद्द्याला हात घातला आहे. "बरं लोकशाहीची बूज राखायची खरोखर इतकी इच्छा असेल तर गोकुळ प्रकरणात तुमच्या भाजप पॅनलचे 12 विरोधात सतेज पाटील पॅनलचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुम्ही सरकारचे (म्हणजे तुमचेच) 5 संचालक का नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देऊन काय सिद्ध करताय तुम्ही?" असा सवाल राज यांनी सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांना विचारला आहे.
'गोकुळ'वर तुम्हाला सत्ता मिळवता नाही आली म्हणून
'गोकुळ'च्या निवडणुकीसंदर्भात बोलताना पुढे राज यांनी, "बरं ते बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून निवडून आले. तुम्हाला खरंच लोकशाहीची पर्वा किंवा काळजी वाटत असती तर हा असला प्रकार तुम्ही केला नसता. गोकुळवर तुम्हाला सत्ता मिळवता नाही आली म्हणून तुम्ही लगेच तुमची सगळी तत्त्वं बाजूला ठेवणार आणि म्हणे लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढणार," असा टोला राज यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरेंची फोनवरुन सतेज पाटलांशी चर्चा
दरम्यान, या प्रकरणी न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाई लढण्यास आपण तयार असल्याचं गुरुवारी सतेज पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. या पत्रकार परिषदेनंतर सतेज पाटलांना, उद्धव ठाकरेंनी फोन केला होता. गोकुळबाबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष तुमच्यासोबत असल्याचं आश्वासन ठाकरेंनी सतेज पाटलांना दिलं. या लढ्यात शिवसेना सतेज पाटील यांच्यासोबत असेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.