शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या बिलॉंगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह या आत्मचरित्रातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या उल्लेखाचा निषेध करण्यासाठी शिंदे गटाने मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी पुस्तकाची पाने फाडताना बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही फाडल्याचा आरोप शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांच्यावर झाला. या घटनेवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. राष्ट्रपुरुषाच्या अपमानासाठी स्वतंत्र कायदा आहे. तो कायदा इथे लागू व्हावा आणि त्याअंतर्गत या पाचही जणांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संजय राऊतांनी केलीय.
18 नोव्हेंबर रोजी मुंबईत शिंदे गटाच्या सहा प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेतली. सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रात सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह उल्लेख असल्याचा आरोप करत त्यांनी पुस्तकाच्या प्रतींची पाने फाडली. याच गोंधळात शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेला कागद फाडले. या घटनेचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वादाला सुरुवात झाली.
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडल्याप्रकरणी माफी मागितली आहे. बाळासाहेब माझ्यासाठी केवळ नेते नसून दैवत होते. आपण मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडला, बाळासाहेबांचा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. बाळासाहेब आमचे दैवत आहेत आणि त्यांचे विचार आम्ही पुढे नेत आहोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. चुकीची माहिती पसरवून आपली बदनामी केल्यास कायदेशीर कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला.
बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्राने राष्ट्रपुरुषाचा दर्जा दिला आहे. त्यांच्या प्रतीमेची किंवा फोटोची अशी जाणीवपूर्वक विटंबना करणे हे केवळ एका महान व्यक्तीविरुद्धचे कृत्य नसून समाजातील भावनांना ठेच पोहोचवणारे, सार्वजनिक शांतता भंग करणारे आणि दोन गटांत तेढ निर्माण करणारे गंभीर कृत्य असल्याचे राऊत म्हणाले.
या घटनेनंतर संजय राऊत यांनी सोशल मीडियावरून शिंदे गटावर जोरदार टीका केली. बाळासाहेबांच्या नावावर राजकारण करणारेच त्यांच्या छायाचित्राचा अपमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले.
राऊतांनी आपल्या भूमिकेत भारतीय न्याय संहितेतील कलमांचा दाखला दिला आहे. यात कलम 196 (गटांमध्ये वैमनस्य निर्माण करणे), कलम 353(सार्वजनिक उपद्रवाला कारणीभूत ठरणारी विधाने), कलम 352 (शांतता भंगास प्रवृत्त करणारा हेतुपुरस्सर अपमान) आणि कलम 298 (धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने पवित्र वस्तूची विटंबना) यांचा उल्लेख आहे.
राऊतांनी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. फोटो कोणाचे होते, ते जाणीवपूर्वक फाडले की अनवधानाने, तसेच संबंधित कृतीमागील हेतू काय होता, याची तपासणी आवश्यक आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा, 1984 लागू होण्यासाठी संबंधित मालमत्ता कायद्यातील व्याख्येनुसार सार्वजनिक मालमत्ता असणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणते कलम लागू होईल, हे पोलिसांचा तपास आणि कायदेशीर पडताळणीनंतरच स्पष्ट होऊ शकते.