काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रामध्ये वीर सावरकरांसंदर्भात वादग्रस्त विधान करण्यात आल्याचा संदर्भ देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषधेमध्ये उपनेते शायना एसी, संजय निरूपम, शितल म्हात्रेंनी आपली भूमिका मांडताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधताना जे काही लिहिलेलं आहे ते तुम्हाला मान्य आहे का? यासंदर्भात तुम्ही भूमिका स्पष्ट करा अशी मागणी केली. विशेष म्हणजे ही मागणी केल्यानंतर त्यांनी या पुस्तकात वीर सावरकरांसंदर्भात वादग्रस्त मजकूर असलेली पानं फाडली. याच संदर्भातून त्यांनी एक जुना फोटोही फाडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा निषेध केला.
फोटोबद्दल उत्सुकता
शिंदेंच्या शिवसेना नेत्यांनी फाडलेल्या फोटोमध्ये बाळासाहेब ठाकरे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला जोडे मारताना दिसत आहेत. हा फोटो सध्या तुफान चर्चेत असून नेमकं त्यावेळी काय घडलं होतं याबद्दल अनेकांना उत्सुकता असून फोटो कधी काढण्यात आला? याबद्दल अनेकांनी उत्सुकता आहे. नेमकं काय घडलं होतं हा फोटो काढताना? हे आंदोलन कशासाठी होतं? जाणून घेऊयात सविस्तरपणे...
कधीचा आहे हा फोटो?
सध्या वादाच्या केंद्रस्थानी असलेला हा फोटो आहे 2004 मधील! काँग्रेस नेते आणि तत्कालीन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेनं आंदोलन केलं होतं. या आंदोलनात सहभागी झालेल्या बाळासाहेब ठाकरेंनी मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला जोडे मारले होते. या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने संपूर्ण महाराष्ट्रभर आक्रमक आंदोलन छेडले होते. हे जोडे मारो आंदोलन याच निषेधाचा भाग होता.
मणीशंकर अय्यर यांनी काय केलेलं?
ऑगस्ट 2004 मध्ये मणिशंकर अय्यर अंदमान आणि निकोबार बेटांच्या दौऱ्यावर गेले होते. तेथील ऐतिहासिक सेल्युलर जेलमधील स्वातंत्र्यज्योतीजवळ असलेल्या फलकावरून त्यांनी सावरकरांच्या कवितेच्या ओळी असलेला फलक हटवण्याचे आदेश दिले होते. इतकेच नाही तर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य मिळवण्याच्या संघर्षातील योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्याविरोधात अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती.
किती तारखेला काढलाय हा फोटो?
मणिशंकर अय्यर यांच्या या कृतीमुळे आणि वक्तव्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. केंद्रीय मंत्र्याने केलेल्या या विधानाचा निषेध करण्यासाठी 27 ऑगस्ट 2004 रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेतर्फे तीव्र निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाची सुरुवात स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली. त्यांनी मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला स्वतःच्या चपलेने मारून केली होती. त्याच वेळी हा फोटो काढण्यात आला होता.
आता या फोटोचा संदर्भ कसा?
ज्याप्रमाणे मणीशंकर अय्यर यांनी सावरकरांचा अपमान केला होता त्यावेळी बाळासाहेबांनी जशी कठोर भूमिका घेतली होती तशी आता उद्धव ठाकरे घेणार का? असा सवाल शिंदेंच्या शिवसेनेच्या उपनेत्यांनी विचारला. याच संदर्भातून त्यांनी पुस्तकातील पानं फाडल्यानंतर 22 वर्षांपूर्वी झालेल्या अशाच वादाच्या निषेधार्थ सुरु असलेल्या आंदोलनातील मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याचा फोटो फाडला होता. त्यावेळी शायना एनसी यांनी हा पुतळ्याचा फोटो फाडण्याऐवजी बाळासाहेबांचाच फोटो फाडल्याने मूळ विषय बाजूला राहून नवीन वादाला तोंड फुटलं!