'फडणवीस आणि सरकारला सत्तेची मस्ती', गोकुळवरुन संजय राऊत संतापले, म्हणाले 'भाजपाची चरबी वाढलीये, CM ना....'
तुम्हाला गोकुळमधील विजय पचत नसेल तर महाराष्ट्रात राजकारण करण्यासाठी लायक नाही अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर टीका केली आहे.
कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. गोकुळच्या सत्तेसाठी महायुती सरकारने मोठा निर्णय घेतलाय. 3 हजार कोटींपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांमध्ये आता दोनऐवजी 4 शासननियुक्त संचालक नेमले जाणार असून, त्यांनाही मतदानाचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे गोकुळ मधील सत्तेचे गणित बदललेले आहे. सरकारच्या या निर्णयावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झालेत. शिवसेना खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारला सत्तेची मस्ती आली आहे अशा शब्दांत टीका केली आहे.
गोकुळ गुजरात लॉबीला विकायचा डाव....
"हा मोठा नसून अत्यंत छोटा निर्णय आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारला आलेली सत्तेची मस्ती आहे. लोकशाही न मानण्याची त्यांची भूमिका आहे. ज्या गोकुळच्या निवडणुकीत समविचारी पॅनेलला 25 पैकी 13 जागांवर विजय मिळवत बहुमत मिळालं आहे ते डालवून जे पराभूत झाले त्यांच्या हातात पुन्हा एकदा गोकुळ द्याययचं आणि ते गुजरात लॉबीला विकायचा डाव फडणवीस करत असतील तर महाराष्ट्र आणि शेतकऱ्यांशी बेईमानी करत आहेत," असा संताप संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.
भाजपाची चरबी वाढली आहे
"रस्त्यावर यांच्याविरोधात लोक उतरले आहेत. यांना नियमांची जाण नाही, शेतकऱ्यांच्या भावना समजत नाही. शेतकऱ्यांनी त्यांना आवडणारं पॅनेल निवडून दिलं. पण हे लोकभावना दडपून टाकत आहेत. ही मस्ती कुठून आली? स्वतचं पॅनेल किंवा सत्ता यावी यासाठी शासन 4 संचालक आपल्या मर्जीने नेमणार याला चरबी म्हणतात. भाजपाची चरबी वाढली आहे. भाजपाला आलेली ही चरबी जनता उतरवेल," असा इशाराच त्यांनी दिला आहे.
...तर महाराष्ट्रात राजकारण करण्यासाठी लायक नाही
"लोकशाही मार्गातून आलेले पॅनेल आहे. एका बाजूला देवेंद्र फडणवीस, जेव्हा राहुल गांधी लोकशाही रक्षणासाठी आणि रेजिम चेंजच्या नावाखाली रस्त्यावर उतरतात तेव्हा शेवटच्या श्वासापर्यंत रेजिम चेंज होऊ देणार नाही कारण लोकशाही मार्गाने सरकार आलं आहे असं सांगतात. मग गोकुळ काय आहे? गोकुळही लोकशाही मार्गाने आलेलं पॅनेल आहे. तुम्हाला हा विजय पचत नसेल तर महाराष्ट्रात राजकारण करण्यासाठी लायक नाही," असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
साडे पाच लाख शेतकऱ्यांचा हा कौल
पुढे ते म्हणाले की, "ज्या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले आणि लोकशाहीचे अनेक स्तंभ निर्माण झाले तिथे बहुमताचा अनादर करुन पराभव झालेल्यांना सत्तेत आणत आहेत. पण लोक तुम्हाला कोल्हापूरच्या रस्त्यावरच याचा जाब विचारतील. हा आता जनतेचा लढा व्हायला पाहिजे. साडे पाच लाख शेतकऱ्यांचा हा कौल आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय सहकारमंत्री हा कौल मानत नसतील. पराभूत झालेल्यांसाठी नियम, संविधान बदल आहात, कारण हा पराभव तुम्हाला स्विकारता येत नाही. शेतकरी, मतदारांनी तुमचा पराभव केला आहे. लोकशाही रक्षणसाठी हा लढा उभा राहिला आहे".
फडणवीसांना किंमत मोजावी लागेल
"गोकुळ वाचवण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र आलं पाहिजे. निवडून आल्यावरही जनतमताचा आदर करायचा नाही ही नवी परंपरा फडणवीसांनी सुरु केली असून त्याची किमत मोजावी लागेल. अमित शाह तर मोजणारच आहेत. मी त्यांना काय परिस्थिती आहे यासंदर्भात पत्र लिहिलं होतं. पण त्यांची वृत्ती झुंडशाहीची आहे. ती मोडून काढून टाकली जाईल," असाही इशारा त्यांनी दिला आहे.