हल्लेखोरांचं पहिले टार्गेट होता आमिर खान, पण अचानक बदलला प्लान, काय घडलं होतं नेमकं?
टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा; शूटर्सचे सुरुवातीचे लक्ष्य आमिर खान होते, पोलिसांच्या तपासातून माहिती समोर
टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात आत्तापर्यंत अनेक नवे अपडेट समोर येत आहेत. पोलिसांनी आरोपींना अटक केली असली तरी चौकशीतून हादरवणारे खुलासे समोर येत आहेत. हल्लोखोरांचं पहिलं टार्गेट टायगर श्रॉफ नव्हताचं, असं आत्तापर्यंतच्या चौकशीत समोर आलं होतं. पोलिसांच्या तपासानुसार, या प्रकरणातील कथित शूटर्सना सुरुवातीला अभिनेता आमिर खान यांना लक्ष्य करण्यास सांगण्यात आले होते.
हल्लोखोरांचे सुरुवातीपासूनचे लक्ष्य आमिर खान होता हे आत्तापर्यंतच्या पोलीस तपासातून समोर आले आहे. बिश्नोई गँगकडून आलेल्या शूटर्सनी आमिर खान याच्या घराच्या परिसराची तीन वेळा रेकी केली होती. मात्र आमिर खान अनेकदा चित्रपटांच्या शूटिंगसाठी बाहेर असायचे किंवा घरी आल्यानंतर अनेक दिवस घराबाहेर पडत नव्हते. त्यामुळं आमिर खान यांच्यापर्यंत पोहोचणे कठीण झाल्याने शूटर्सनी टायगर श्रॉफला लक्ष्य केले, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, टायगर श्रॉफ दर रविवारी जुहू येथील उद्यानात फुटबॉल खेळण्यासाठी येत असल्याची माहिती शूटर्सना मिळाली होती. त्यानंतर शूटर्सने टायगर श्रॉफच्या घराची रेकी केली होती. तसंच, 11ऑक्टोबर रोजीच टायगर श्रॉफवर हल्ला करण्याची तयारी हल्लेखोरांनी केली होती. मात्र त्या दिवशी तो फुटबॉल खेळण्यासाठी आला नव्हता. त्यामुळं त्यांनी 18 ऑक्टोबर रोजी पुन्हा जुहू पुष्पा पार्क येथे रेकी केली होती.
रणबीर कपूरच्या घराचीही रेकी
टायगरवर हल्ला करणाऱ्या आरोपींनी बॉलिवूडचा हँडसम हंक रणबीर कपूरच्या वांद्रे येथील घराची पाहणी (रेकी) देखील केली होती. या बातमीमुळे इंडस्ट्रीतही खळबळ उडाली आहे. रणबीर कपूर देखील हल्लेखोरांच्या निशाण्यावर असल्याचं सांगण्यात आलंय.
कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न
टायगरवरील हल्ल्यानंतर बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हल्लेखोरांबद्दल समोर येत असलेल्या माहितीमुळे सेलिब्रिटींमध्ये अधिकच चिंता वाढली आहे. सलमान खानच्या घरी सशस्त्र कमांडो तैनात करून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. अक्षय कुमारच्या घराबाहेर बुलेटप्रूफ काच लावण्यात आली आहे.
अनिल पंडितला वॉन्टेड आरोपी घोषित करण्यात आले
लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य अनिल पंडित याला टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात वॉन्टेड आरोपी घोषित करण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टद्वारे अनिल पंडितने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा समोर आला होता. अटक केलेल्या तीन आरोपींना वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयात हजर करून पोलिसांनी 9 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली.