शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल! सुप्रिया सुळेंनी सांगितलं कारण; म्हणाल्या '...बाबा ऐकत नाहीत'
शरद पवार यांना पुन्हा एकदा प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
शरद पवारांना पुन्हा एकदा प्रकृतीच्या कारणास्तव मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुप्रिया सुळे यांनी डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने शरद पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. डॉक्टरांकडून शरद पवारांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान शरद पवारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचले होते.
सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत डॉक्टरांनी शरद पवारांना प्रवास कमी करण्याचा तसेच विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती दिली आहे. मात्र बाबा ऐकत नाहीत. त्यांना कामात रमून जायला आवडते असंही सांगितलं आहे. बाबांची तब्येत ठीक आहे अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
सुप्रिया सुळेंची पोस्ट -
"डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने बाबांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना प्रवास कमी करण्याचा तसेच विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पण बाबा ऐकत नाहीत. त्यांना कामात रमून जायला आवडते. बाबांची तब्येत ठीक आहे. आपण सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार," असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
दरम्यान शरद पवार यांना आज डिस्चार्ज मिळणार नसून, अजून तीन ते चार दिवस ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचार होणार आहेत. डिहायड्रेशनमुळे शरद पवार यांना त्रास जाणवत आहे. डॅाक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलेला असतानाही प्रवास केल्याने त्रास वाढला असल्याची माहिती आहे.
याआधी 5 नोव्हेंबरला छाती आणि श्वसनमार्गाच्या संसर्गामुळे शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातील एका डॉक्टरने सांगितलं होतं की, त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर ब्राँकायटिससारख्या आजारावर उपचार सुरू आहेत. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, जिथे त्यांच्यावर 2 नोव्हेंबरपासून उपचार सुरू होते.
रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य हृदयरोगतज्ञ, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पूर्वेझ ग्रांट यांनी सांगितले होते की, प्लुरिटिक वेदनेच्या तक्रारीनंतर पवार यांना सर्वसाधारण तपासणी आणि वैद्यकीय निरीक्षणासाठी दाखल करण्यात आलं होतं. प्लुरिटिक वेदना म्हणजे छातीत होणारी तीव्र, टोचल्यासारखी किंवा जळजळणारी वेदना, जी श्वास घेताना, खोकताना, शिंकताना किंवा हसताना वाढते.