टायगर श्रॉफला गोळी लागली नाही तरी हातावर आणि छातीला बँडेज का? गंभीर जखमा कशा झाल्या?
मुंबईत रविवारी रात्री बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. टायगरवर पाच राउंड फायर करण्यात आले.
टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर देशात एकच खळबळ उडाली आहे. जुहूयेथील मैदानातून परतल्यानंतर त्याच्यावर गाडीवर गोळीबार करण्यात आला. तबब्ल पाच राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती मिळते. सुदैवाने टायगरला गोळी लागली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र आता समोर आलेल्या फोटोत टायगरच्या हाताला आणि छातीवर जखम असल्याचे दिसून येतेय. त्यामुळं टायगरला नेमकी दुखापत कशी झाली याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
अभिनेता टायगर श्रॉफच्या बीएमडब्ल्यू कारवर गोळीबार करण्यासाठी हल्लेखोरांनी गावठी पिस्तूलाचा वापर केल्याचे न्यायवैद्यक तपासणीतून समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हल्लेखोरांनी कारवर एकूण सात गोळ्या झाडल्या. त्यापैकी पाच गोळ्या कारला लागल्या, तर दोन गोळ्या लक्ष्य चुकवून गेल्या. यात टायगरच्या ड्रायव्हरला गोळी लागली असून तो जखमी झाला. इतकंच नव्हे तर एका रिक्षाचालकाला आणि प्रत्यक्षदर्शींदेखील जखमी झाले.
सुदैवाने टायगर श्रॉफ कारच्या दुसऱ्या बाजूला बसलेला असल्याने त्याला गंभीर दुखापत झाली नाही किंवा गोळी लागलेली नाही. मात्र अगदी जवळून झालेल्या या फायरिंगमुळं आणि काचा फुटल्यामुळं टायगरच्या हाताला जखमा झाल्या आहेतच. तसंच, छातीवर गनपावडर बर्न म्हणजेच भाजले आहे. ज्याचे फोटोही समोर आले आहेत. त्यामुळंच टायगर श्रॉफच्या हाताला आणि छातीला बँडेज करण्यात आलेले आहे.
हल्ल्यानंतर टायगर श्रॉफचा पहिला व्हिडिओ
टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये, टायगरच्या हाताला गनपावडरने भाजलेलं दिसत असून बँडेजदेखील केले आहे. टायगर आईसोबत बसून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलताना दिसतोय, त्याच्या छातीवरही बँडेज लावलेले दिसतेय. टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर, अनेक सेलिब्रिटी आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी त्याच्या घरी सतत भेटी दिल्या आहेत. अभिनेत्याची जवळची मैत्रीण, दिशा पटानी हिनेही त्याची भेट घेतली, तिच्या चेहऱ्यावर तणावाची स्पष्ट चिन्हे दिसत होती.
दरम्यान, गोळीबारानंतर टायगर स्वतः कार चालवत जखमी चालकाला घेऊन रुग्णालयात पोहोचला होता. टायगरच्या या समयसूचकतेचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे. तर, मुंबई पोलिसांच्या 15 पथकांकडून टायगरवरील हल्ल्याचा तपास सुरू आहे. फॉरेन्सिककडून टीमकडून घटनास्थळीची पाहणी करण्यात आली. तर एका संशयितांला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
गोळीबार करण्यापूर्वी रेकी
गोळीबार करण्यापूर्वी आरोपींनी पुष्पा पार्क परिसरात सुमारे 45 मिनिटे थांबून रेकी केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानंतर दोघांनी घटनास्थळावरून मोटारसायकलवरून पळ काढला. तिसऱ्या साथीदाराने ही मोटारसायकल तयार ठेवली होती. मोटारसायकल अंधेरी स्थानकात सोडून देत आरोपी ट्रेनने पळून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.