पालक, विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक बातमी! महाराष्ट्रातील 18534 विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेला बसता येणार नाही; कारण...
राज्यातील सर्व बोर्डाशी संलग्नित असलेल्या एकूण 1 हजार 218 कनिष्ठ महाविद्यालयांतील 18 हजार 534 विद्यार्थी बाधित असल्याचे सांगण्यात आले आहे.
अकरावीमध्ये ऑफलाइन प्रवेश घेतल्यामुळे ऑनलाईन सिस्टीममधील यूडीआयएसईमध्ये (UDISE) नोंदणी झाली नसलेल्या राज्यातील 18 हजार 534 विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेपासून वंचित राहावं लागण्याची शक्यता असल्याचं समोर आलंय. अकरावीचे वर्ष पूर्ण झाल्यानंतर यंदा बारावीचा परीक्षा अर्ज भरण्याच्या टप्प्यावर हा गोंधळ झाल्याचं समोर आलाय. या प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या प्रवेश प्रक्रियेच्या अंमलबजावणीवर आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदींच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या प्रश्नांची उत्तर शोधावी लागणार
राज्यातल्या आठ बोर्डातील 1 हजार 218 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीचे प्रवेश ऑफलाइन पद्धतीने झाल्याचे समोर आले आहे. यूडीआयएसई (UDISE) ही देशातील शालेय शिक्षणाशी संबंधित माहिती संकलित आणि व्यवस्थापित करण्यासाठी वापरली जाणारी डिजिटल प्रणाली आहे. शाळा, विद्यार्थी आणि शैक्षणिक व्यवस्थेशी संबंधित विविध माहितीच्या नोंदी या प्रणालीद्वारे केल्या जातात. संबंधित विद्यार्थ्यांची यूडीआयएसई (UDISE) प्रणालीमध्ये नोंदणी नसल्याने त्यांना बारावीचा परीक्षा अर्ज भरण्यात अडथळे येत आहेत. या प्रकरणात संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेश देताना नियमांचे पालन केले होते का? विद्यार्थ्यांची माहिती निर्धारित वेळेत ऑनलाइन नोंदवण्यात आली होती का? नोंदणीतील त्रुटी वेळेत का दूर करण्यात आल्या नाहीत, याची तपासणी होणे आवश्यक आहे.
यूडीआयएसई आहे काय?
यूडीआयएसई (UDISE) हा शब्द युनिफाइड डिस्ट्रीक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस याचा शॉर्टफॉर्म आहे. खरं तर ही यंत्रणा केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत चालवली जाणारी देशातील सर्व मान्यताप्राप्त शाळांची एक राष्ट्रीय डिजिटल डेटा प्रणाली आहे. प्रत्येक शाळेला 11 अंकड्यांचा एक विशिष्ट कोड दिला जातो, ज्याद्वारे त्या शाळेची, तेथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती शासनाकडे ऑनलाइन नोंदवली जाते. अकरावी प्रवेश अर्जाचा (पार्ट-1) फॉर्म भरताना विद्यार्थ्यांनी दहावी उत्तीर्ण केलेल्या शाळेचा 11 आकड्यांचा यूडीआयएसई कोड टाकणे आवश्यक असते. या क्रमांकाच्या माध्यमातून विद्यार्थ्याची दहावीपर्यंतची पार्श्वभूमी, गुणांचा इतिहास सहज कळतो.
कोणत्या बोर्डातले किती विद्यार्थी?
विभागनिहाय बाधित विद्यार्थी आणि संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
मुंबई बोर्ड : 193 महाविद्यालये, 6,478 विद्यार्थी
पुणे बोर्ड : 177 महाविद्यालये, 2,593 विद्यार्थी
छत्रपती संभाजीनगर बोर्ड : 175 महाविद्यालये, 1,718 विद्यार्थी
अमरावती बोर्ड : 124 महाविद्यालये, 1,137 विद्यार्थी
कोल्हापूर बोर्ड : 170 महाविद्यालये, 1,611 विद्यार्थी
लातूर बोर्ड : 83 महाविद्यालये, 846 विद्यार्थी
नागपूर बोर्ड : 178 महाविद्यालये, 1,945 विद्यार्थी
नाशिक बोर्ड : 118 महाविद्यालये विद्यार्थी २२०६
राज्यातील सर्व बोर्डाशी संलग्नित असलेल्या एकूण 1 हजार 218 कनिष्ठ महाविद्यालयांतील 18 हजार 534 विद्यार्थी बाधित असल्याचे सांगण्यात आले आहे.