बुलढाणा जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीवर पीसीपीएनडीटी पथकाने कारवाई केली आहे. बोगस डॉक्टरसह तीन जणांना रंगेहात पकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आली आहे. अकोला, वाशिम आणि बुलढाणा पथकाच्या संयुक्त कारवाईत अमडापूर-लव्हाळा मार्गावरील शेतात सुरू असलेला हा प्रकार उघडकीस आला असून, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमडापूर–लवाळा मार्गावरील एका शेतातील पत्र्याच्या गोठ्यात पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांच्या पीसीपीएनडीटी विभागाने संयुक्तपणे रचलेल्या सापळ्यात एका बोगस डॉक्टरसह तिघांना रंगेहात ताब्यात घेतलं आहे.
विशेष म्हणजे, तब्बल आठ तास संशयित डॉक्टरचा माग काढल्यानंतर डिकॉय केसच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि तपासणीसाठी वापरण्यात येणारं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
धक्कादायक म्हणजे, हा सगळा प्रकार शेतातील पत्राच्या गोठ्यात सुरू होता. बोगस डॉक्टर पोर्टेबल सोनोग्राफी मशीन घेऊन ठिकठिकाणी जाऊन गर्भलिंग निदान करीत असल्याची माहिती पीसीपीएनडीटी विभागाला मिळाली होती. या कारवाईदरम्यान बोगस डॉक्टर घटनास्थळावरुन पसार झाला. तर वाशिम येथील एजंट राहुल नामदेव इंगळे आणि शेतमालक शंकरराव सूर्यवंशी व श्रेयस गणेश सूर्यवंशी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी प्रशासनाच्या या कारवाईनंतर आता या प्रकरणात आणखी कोणाचे धागेदोरे समोर येतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
उपजिल्हा रुग्णालय चिखलीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमर सय्यद यांच्या फिर्यादीवरून तिन्ही आरोपींविरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.