देभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल बुधवारी जाहीर झाले. मतपत्रिकांवर घेण्यात आलेल्या या निवडणुकींची मतमोजणी दोन दिवस सुरु होती. विरोधकांकडून व्होट चोरीचे आरोप ईव्हीएमसंदर्भात सुरु असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर मतपत्रिकांवर घेतलेल्या या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागलं होतं. असं असतानाच याच मुद्द्यावरुन काल दुपारच्या सुमारास अंतिम विजेते घोषित होण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावरुन काँग्रेसला ट्रोल केलं. आपल्या अधिकृत अकाऊंटवरुन केलेल्या पोस्टमध्ये मोदींनी काँग्रेसला किती जागा मिळाल्या असा खोचक सवाल विचारला. त्यावेळी काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नव्हती. मात्र रात्री उशीरा लागलेल्या निकालांमध्ये काँग्रेसने नागपुरमध्ये सलग दुसऱ्यांदा पदवीधरमध्ये भाजपाला धूळ चारल्याच्या वृत्तावर अंतिम निकाल जाहीर होताच शिक्कामोर्तब झाल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या महिला खासदाराने पंतप्रधानांना या निकालावरुन सुनावलं आहे.
मोदी काय म्हणाले होते?
मोदींनी सायंकाळी 5 वाजून 51 मिनिटांनी केलेल्या पोस्टमध्ये, "उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या 4 मोठ्या राज्यांमधील 28 जागांवर विधान परिषदेच्या निवडणुका. मतपत्रिका वापरून निवडणुका पार पडल्या. अंदाज लावा, काँग्रेसने किती जागा जिंकल्या?," अशी विचारणा करत काँग्रेसला डिवचलं होतं. पंतप्रधान मोदींनी या पोस्टमध्ये इमोजीही वापरला.

काँग्रेसच्या खासदाराने काय म्हटलं?
"नागपूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी सलग दुस-यावेळी भाजपा उमेदवाराला पराभवाची धूळ चारली आहे. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात काँग्रेसने भाजपाचा पराभव केला आहे," असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. तसेच, "5 जागांच्या निवडणूकीत 3 जागांवर महाविकास आघाडी विजयी झाली आहे. भाजपाच्या सत्तेचा माज लोकांनी या निवडणूकीत उतरवला आहे. निकाल जाहीर होण्याआधीच पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला झिरो दिला, एवढा उताविळपणा बरे नव्हे. विधान परिषदेतील निकाल ही महायुतीला मोठी चपराक आहे," असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. "काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी आणि मविआचे विजयी उमेदवार यांच्यासह सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा," असं वर्षा गायकवाड यांनी पोस्टच्या शेवटी लिहिलं आहे.

महाराष्ट्रात पदवीधरांच्या सर्व जागा महाविकास आघाडीला
महाराष्ट्रात केवळ नागपूर नाही तर पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथेही पदवीधरची जागा महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. पुण्यात भाजपाला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवारांच्या पक्षाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धूळ चारली. पुण्यामधून हर्षदा जाधव-देशमुख निवडून आल्या असून त्यांनी भाजपाच्या डॉ. स्मिता जाधव यांचा पराभव केला आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील विजयी झाले आहेत. त्यांनी 18 वर्षांपासूनची महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांची सत्ता संपुष्टात आणली आहे.