नागपूरमध्ये ढिगाऱ्याखाली 3.74 कोटीचं घबाड,महाराष्ट्र पोलिसांचे MPमध्ये ऑपरेशन; काय घडलं नेमकं?
नागपुरात व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्यांकडून 3.74 कोटी रुपयांची रोकड लुटण्यात आली. झूम कारच्या माध्यमातून रेकी केल्याचा संशय असून बालाघाटमध्ये 3.28 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील नागपूरमध्ये कोट्यवधी रुपयांच्या रोकड लुटीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून सशस्त्र टोळीने तब्बल 3 कोटी 74 लाख रुपयांची रोकड लंपास केली. या गुन्ह्याचा तपास करताना नागपूर पोलिसांना मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात मोठे यश मिळाले. एका शेतात गवताच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवलेली 3 कोटी 28 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणात काही संशयितांना अटक करण्यात आली असून सहा आरोपी अद्याप फरार आहेत. विशेष म्हणजे, गुन्हा करण्यापूर्वी झूमकार अॅपच्या माध्यमातून व्यापाऱ्याच्या घराची रेकी केली. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
तीन पोत्यांमध्ये लपवली होती रोकड
नागपूर पोलिसांनी मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील डोरली माल गावात शोधमोहीम राबवली. यावेळी एका शेतातील गवताच्या ढिगाऱ्याखाली तीन पोती लपवून ठेवल्याचे आढळले. या पोत्यांमध्ये तब्बल 3 कोटी 28 लाख रुपये होते. पोलिसांनी ही संपूर्ण रक्कम जप्त केली. लुटीनंतर पोलिसांची नजर चुकवण्यासाठी आरोपींनी ही रोकड नागपूरपासून दूर नेऊन शेतात लपवल्याचा संशय आहे.
व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला
नागपूरमधील तुलसीनगर हा परिसर शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. सुरेश परमार हे धान्य आणि फायनान्स व्यवसायाशी संबंधित व्यापारी आहेत. त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात रोकड होती. याच कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून चार ते पाच मुखवटाधारी हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर रोकड असलेली एसयूव्ही घेऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेत 3.74 कोटी रुपयांची रोकड लुटण्यात आली होती.
व्यापाऱ्याच्या घराची रेकी
या लुटीमागे पूर्वनियोजित कट असल्याचा संशय पोलिसांना आहे. तपासादरम्यान शुभम डहरवाल, अजय यादव आणि रितेश मरस्कोल्हे यांनी झूमकार अॅपच्या माध्यमातून कार बुक केल्याची माहिती समोर आली. या कारचा वापर व्यापाऱ्याचे घर, त्यांची दैनंदिन ये-जा आणि हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. रेकी केल्यानंतर योग्य संधी साधून लुटीचा कट प्रत्यक्षात आणण्यात आला.
वाहन सोडून आरोपी पसार
लुटीनंतर आरोपी नागपूरमधून मध्य प्रदेशातील बालाघाटच्या दिशेने गेले. तपासातील माहितीनुसार, गुन्ह्यात वापरलेली कार बालाघाट रेल्वे स्थानकाजवळ उभी करण्यात आली होती. त्यानंतर लुटीची रोकड तीन पोत्यांमध्ये भरून डोरली माल गावातील शेतात लपवण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे संशयितांचा माग काढला. या तपासासाठी महाराष्ट्र पोलिसांनी मध्य प्रदेशात शोधमोहीम राबवली.
दोन आरोपींची नावे समोर
या प्रकरणात चंद्रकांत बघेल आणि रजनीकांत चंद्रभान या आरोपींना अटक केली. शुभम डहरवाल, अजय यादव, विशाल सोनगडे आणि रितेश मरस्कोल्हे यांच्यासह अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. गिट्टीखदान परिसरातील जगदीशनगरशी संबंधित जुनघरे आणि आणखी एका व्यक्तीच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे.
उर्वरित 46 लाख रुपयांचा शोध सुरू
या लुटीत एकूण 3 कोटी 74 लाख रुपये चोरीला गेले होते. त्यापैकी 3 कोटी 28 लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यामुळे उर्वरित 46 लाख रुपयांचा शोध घेणे हे पोलिसांसमोरचे मोठे आव्हान आहे. ही रक्कम अन्य ठिकाणी लपवण्यात आली आहे की खर्च करण्यात आली, याचा तपास सुरू आहे. फरार आरोपींच्या अटकेनंतर लुटीचे नियोजन, रोकड लपवण्याचे ठिकाण आणि या गुन्ह्यातील इतर मदतनीस यांच्याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.