'2047 मध्ये भारताला इस्लाम राष्ट्र बनविण्यासाठी...', जाहीर सभेत नितेश राणेंचं विधान
अभिनेत्री दिया मिर्झावर निशाणा साधण्याबरोबरच नितेश राणेंनी इंडिया आघाडीमधील पक्षांनाही लक्ष्य केल्याचं दिसून आलं. नितेश राणेंनी नेमकं जाहीर भाषणामध्ये काय म्हटलं आहे जाणून घ्या...
अभिनेत्री दिया मिर्झाच्या दिवाळीविषयक व्हिडीओवरुन नव्या वादाला तोंड फुटलेलं असतानाच आता या प्रकरणावरुन नितेश राणेंनी नागपुरमध्ये भाष्य केलं आहे. पत्रकारांशी बोलताना दियावर निशाणा सधतानाच जाहीर कार्यक्रमातील भाषणामध्ये नितेश राणेंनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला लक्ष्य केल्याचं दिसून आलं.
जेवढी काळजी तिला हिंदू सणाची आणि पर्यावरणाची आहे तेवढीच...
पत्रकारांशी संवाद साधताना, "हा प्रश्न मुंबई महानगरपालिकेला विचारला गेला पाहिजे. माझ्याकडे त्याचे अधिकार नाहीत," असं म्हणत नितेश राणेंनी दिया मिर्झासंदर्भातील प्रश्नावर भाष्य करण्यास सुरुवात केली. याच प्रश्नाला उत्तर देताना, "दिया मिर्झा ही ईद, रमजान किंवा मोहरमच्या वेळी असे ट्विट करताना आम्हाला दिसली नाही. बकरी कापू नका त्यामुळे जनावरांना त्रास होतो, असं आवाहन दिया मिर्झा करताना आम्हाला कधी दिसली नाही. जेवढी काळजी तिला हिंदू सणाची आणि पर्यावरणाची आहे तेवढीच ईद, मोहरम आणि बकरी ईदच्या वेळी काळजी घेतली तर आम्हाला सर्वधर्मसमभाव असं कळेल," असा टोला नितेश राणेंनी लगावला. "सर्व सल्ला हिंदू धर्माच्या सणाबद्दल असेल तर त्याला आक्षेप आहे. तिकडे बसलेले जबाबदार लोक हायकोर्टाच्या आदेशाचा आदर करतील. कधी करायचे ते आयुक्त किंवा महापौर हे सांगू शकतील," असं नितेश राणेंनी दियाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड करण्यासंदर्भातील निर्णयावर भाष्य करताना म्हणाले.
बांगलादेश, नेपाळमध्ये काय झालं ते पहिलं ना?
पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर कार्यक्रमात भाषणादरम्यान नितेश राणेंनी, "आपल्या राष्ट्रांकडे कोणी वाकडी नजर करून कोणी पाहत असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी आजची सभा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अराजकता पसरविण्याचे काम सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाकडे वाकड्या नजरेने बघितलं जात आहे. 2047 मध्ये भारताला इस्लाम राष्ट्र बनविण्यासाठी लढाई सुरू आहे," असा खळबळजनक दावा केला. "बांगलादेश, नेपाळमध्ये काय झालं ते पहिलं ना? एक दिवस भारतात वंदे मातरम, जय श्री राम बोलण्यापासून रोखले जाईल. राहुल गांधी, इंडीया आघाडीचे नेते रिजिम चेंज करायची बोलतात," असं म्हणत नितेश राणेंनी विरोधकांवर निशाणा साधला.
अराजकता पसरविण्याचे प्रयत्न
भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूर महानगर यांच्या वतीने ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ अभियानांतर्गत आयोजित ‘युवा शंखनाद’ कार्यक्रमादरम्यान नितेश राणे बोलत होते. आपल्या एकसंघ भारताकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नये, यासाठी देशाचे संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी देशातील तरुणांवर आहे. आज काही समाजकंटकांकडून देशात अराजकता पसरविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही नितेश राणेंनी आपल्या भाषणात म्हटलं.