अकोला शहरातील मोठी उमरी परिसरातील 29 वर्षीय तरुणाचा मध्य प्रदेशातील इंदूर येथे संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जादूटोणा आणि गुप्तधन शोधण्याच्या अघोरी प्रकारासाठी मित्रानेच आपल्या भावाचा खून करून नरबळी' दिल्याचा खळबळजनक आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी अकोल्यातील सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. हेमंत सपकाळ असे या मृत तरुणाचे नाव आहे. त्याचा भाऊ मुकुंद यांनी 18 नोव्हेंबर 2026 रोजी सिव्हील लाईन पोलीस निरीक्षकांना यासंदर्भात लेखी निवेदन दिले आहे.
तक्रारीनुसार, 12 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 7 ते 8 वाजण्याच्या सुमारास हेमंत त्याचे परिचित विवेक ऊर्फ विक्की शिंदे, अजय गायकवाड आणि अन्य एका व्यक्तीसोबत अमरावतीला जात आहे असे सांगून घराबाहेर पडला होता. त्यानंतर 15 नोव्हेंबरच्या दुपारी 2 वाजेपर्यंत त्याचे कुटुंबीयांशी फोनवर सामान्य संभाषण होत होते आणि त्याने दुसऱ्या दिवशी घरी येणार असल्याचे सांगितले होते.
15 नोव्हेंबरच्या सायंकाळी हेमंतने कुटुंबीयांना पुन्हा फोन केला आणि अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत "माझा जीव धोक्यात आहे, हे लोक मला आज रात्री मारणार आहेत," असे सांगितले. विचारपूस केली असता, आपण अमरावतीऐवजी इंदूर येथे असून त्यांनीच आपल्याला येथे आणल्याचे हेमंतने सांगितले. "मी सध्या त्यांच्यापासून दूर आहे, पण विक्की मला फोन करून सतत बोलावत आहे, मला वाचवा," अशी आर्त हाक त्याने दिली. कुटुंबीयांनी त्याला त्यांच्याकडे न जाण्याचा सल्ला दिला, मात्र त्यानंतर हेमंतचा फोन बंद झाला.त्याच रात्री १२ वाजता भाऊ मुकुंद याने विवेक ऊर्फ विक्की शिंदेला फोन केला असता, "आम्ही रेल्वेमध्ये आहोत आणि हेमंत मागच्या डब्यात आहे," असे उत्तर दिले.
मात्र 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता हेमंतचा बंद असलेला मोबाईल सुरू झाला. मुकुंद यांनी त्यावर कॉल केला असता समोरून इंदूरच्या एम.जी. रोड पोलीस ठाण्यातील पोलिसांनी फोन उचलला आणि हेमंतचा मृत्यू झाल्याची माहिती देत कुटुंबीयांना तात्काळ इंदूरला बोलावून घेतले. कुटुंबीयांनी इंदूर गाठल्यानंतर 17 नोव्हेंबर रोजी शवविच्छेदन ) करण्यात आले आणि त्यानंतर अकोल्यातील मोठी उमरी येथील स्मशानभूमीत हेमंतवर अंत्यसंस्कार पार पडले.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, संशयित आरोपी विवेक ऊर्फ विक्की शिंदे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. तो जादूटोणा आणि गुप्तधन शोधण्यासारखे प्रकार करत असल्याचे व्हिडिओ देखील उपलब्ध असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. याच अघोरी कृत्यासाठी विक्की शिंदे आणि त्याच्या साथीदारांनी हेमंतचा खून करून त्याचा बळी दिल्याची दाट शंका कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा आणि कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी सपकाळ कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली आहे.