जळगावात ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन भीषण अपघात! 5 जणांचा मृत्यू; तीन चिमुरड्यांचा समावेश
जळगावात ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
जळगावात ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. जामनेर तालुक्यातील मालदाभाटी येथे हा अपघात झाला. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचं समजत आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत.
जळगावच्या जामनेर तालुक्यातील मालदाभाटीजवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. जामनेर बोदवड रोडवर झालेल्या अपघातात पाच जण मृत्युमुखी पडले आहेत. मयतांमध्ये तीन बालकांचा समावेश आहे. सर्व मृत एकाच बाईकवरुन प्रवास करत होते असं समजत आहेत. मयत मध्य प्रदेश मधील बराणपुर येथील रहिवासी आहेत. सर्वजण एकाच कुटुंबातील होते. घटनेनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
वाशिममध्ये दुचाकीची समोरासमोर धडक होऊन तिघांचा मृत्यू
वाशिम जिल्ह्यातील संभाजीनगर–नागपूर द्रुतगती महामार्गावर शेलूबाजारजवळील तपोवन फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात कारंजा नगर परिषदेच्या उर्दू शाळेचे मुख्याध्यापक आबिद हुसैन आणि शिक्षक नाजिम अहमद यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी लक्ष्मण चव्हाण यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. दोन्ही शिक्षक कार्यालयीन कामानिमित्त वाशिमकडे जात होते. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
यवतमाळमध्ये दोन अपघातात पाच जणांचा मृत्यू
यवतमाळच्या पुसद आणि दारव्हा येथे झालेल्या दोन वाहन अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुसद-दिग्रस मार्गावरील पुस नदीच्या पुलावर ट्रकच्या मागील चाकात येऊन मोपेड स्वार दोघांचा मृत्यू झाला. युसुफ शहा चांद शहा आणि यादव टारफे अशी मृतांची नावे आहेत. अतिशय वर्दळीच्या या अपघात स्थळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दुसरा अपघात दारव्हा–आर्णी मार्गावर सायखेडा जवळ एसटी बस आणि दुचाकी मध्ये झाला, बसच्या भीषण धडकेत दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात रामगाव (हरू) येथील किशोर व दीपक चव्हाण हे दोन सख्खे भाऊ आणि पवन पवार या पंधरा वर्षे मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने, गावावर शोककळा पसरली.