महाराष्ट्राची गंगा असलेल्या नाशिकच्या गोदावरीच्या पाण्यात ऑक्सिजन उरलेलाच नाही; पाण्याचे नमुने पाहून संशोधक हादरले!
महाराष्ट्राची गंगा अशी ओळख असलेली गोदावरी नदी अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. गोदावरी नदीत ऑक्सिजन उरलेलाच नाही. परिक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नाशिक : नाशिकची जीवनदायिनी आणि दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी आता अक्षरशः मृत्यूशय्येवर आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याची धामधूम सुरू असतानाच एक अत्यंत चिंताजनक वास्तव समोर आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार, गोदावरीच्या पाण्यात आता प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन उरलेलाच नाहीये आणि नदी जैविकदृष्ट्या पूर्णपणे मृत झाली आहे.
कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेली गोदावरी आता फक्त नावापुरती नदी उरली आहे का प्रश्न उपस्थित होत आहे. विनाशप्रक्रिया सोडलेले सांडपाणी, मानवी विष्ठा आणि रासायनिक कचऱ्यामुळे नदी महाकाय गटारीकडे वाटचाल सुरु आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 5 ऑक्टोबरला प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोदावरी-कपिला संगम तपोवन, नांदूर-दसक आणि टाकळी या तीन ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेतले. याच्या निरिक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
19 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या या अहवालाने सर्वांचीच झोप उडवली. कारण या तिन्ही ठिकाणी पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन चक्क शून्य आढळला आहे. प्रदूषणाची आकडेवारी भीषण वास्तव मांडणारी आहे. तपोवन संगमावर बीओडी सुरक्षित मर्यादेपेक्षा तब्बल 28 पटीने जास्त आढळून आला आहे. या अहवालातून स्पष्ट झाले आहे की हे पाणी आता करड्या रंगाचे, गढूळ आणि तीव्र दुर्गंधीयुक्त झाल आहे. एवढेच नाही तर हे पाणी स्नानासाठीही असुरक्षित बनलं आहे.
निरीक्षणातून समोर आली धक्कादायक आकडेवारी
तपोवन येथील गोदावरी-कपिला संगमावर बीओडी 85, तर सीओडी 197 मिलिग्रॅम
नांदूर-दसक परिसरात बीओडी 51, तर सीओडी 48 इतका आहे.
तपोवन नमुन्यात फिकल कॉलिफॉर्म 70 आणि टोटल कॉलिफॉर्म 280 एमएल
नांदूर-दसकमध्ये फिकल कॉलिफॉर्म 63 तर टाकळी परिसरात फिकल कॉलिफॉर्म 33 नोंदवले गेले
पाण्यात ऑक्सिजन नसणे म्हणजे नदीतील जलचर, मासे आणि सूक्ष्मजीव साखळी संकटात आहे.
कोट्यवधी रुपयांचा निधी कुंभमेळ्यासाठी खर्च होत असताना, नदीत सांडपाणी आणि जैविक प्रदूषणाचा हा परिणाम प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
प्राणवायू हरवलेल्या या मृत गोदावरीला आता नवसंजीवनी मिळणार का, हाच खरा प्रश्न आहे.