विमा रक्कम हडपण्याचा डाव फोटोवरील तारखेने उधळला आणि चार पोलिसांवर खटल्यास शासनाने मंजुरी दिली आहे. आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू दाखवून 50 लाखांचा विमा लाटण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घेऊयात.
आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव रचून 50 लाख रुपयांची विमा रक्कम हडपण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या कटात मृताची पत्नी, भाऊ, वैद्यकीय अधिकारी, विमा एजंट आणि चार पोलिस कर्मचारी सहभागी असल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणातील चार पोलिसांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील राजेंद्र शालिंदर जाधव यांचा 23 फेब्रुवारी 2024 रोजी आजारामुळे मृत्यू झाला होता. मात्र, त्यानंतर त्यांच्या पत्नीने, भावाने आणि काही एजंटांनी संगनमत करून 19 एप्रिल 2025 रोजी चाळीसगाव, मेहुणबारे पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव रचला. विमा कंपनीकडून 50 लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा मिळवण्यासाठी खोटा वैद्यकीय अहवाल, पंचनामा आणि इतर कागदपत्रे तयार करण्यात आली.
यात चार पोलिस कर्मचाऱ्यांनीही मदत केल्याचा आरोप आहे. विमा कंपनीचे अधिकारी पडताळणीसाठी जाधव यांच्या घरी गेले असता भिंतीवर लावलेल्या त्यांच्या फोटोवरील मृत्यूची खरी तारीख (23 फेब्रुवारी 2024) निदर्शनास आली. अपघाताची कथित तारीख 19 एप्रिल 2025 असताना फोटोवरील तारीख बदलण्याचे राहून गेल्याने संपूर्ण बनाव उघड झाला.
या प्रकरणी 7 मार्च 2026 रोजी मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान विविध 10 विमा कंपन्यांकडून कोट्यवधी रुपयांचे विमा दावे लाटण्याचा कट असल्याचेही समोर आले. या प्रकरणात तत्कालीन मेहुणबारे पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार रवींद्र बत्तीसे, सचिन निकम, चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यातील सुनील निकम आणि पाचोरा पोलिस ठाण्यातील महेंद्र प्रकाश पाटील या चौघांनी लोकसेवक असताना गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य केल्याचा सबळ पुरावा तपासात उपलब्ध झाला.
त्यानुसार 1 जून रोजी पोलिस अधीक्षकांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविला. त्यानंतर 4 जून रोजी विशेष पोलिस महानिरीक्षकांनी, तर 13 ऑगस्ट रोजी विशेष पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) यांनी शासनाला तपासणी अहवाल सादर केला. या अहवालांच्या आधारे संबंधित चारही पोलिसांविरुद्ध सक्षम न्यायालयात खटला दाखल करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील न्यायालयीन कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.