13 तरुणी अन् 1 हजारात सौदा...; पुण्यात फेमस रिसॉर्टवरील छाप्याने मोठी खळबळ
पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध रिसॉर्टमध्ये फक्त हजार रुपयांसाठी महिलांकडून नको ते कृत्य करून घेत जात होतं. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील प्रसिद्ध रिसॉर्टवर धाड टाकल्यानंतर मोठी खळबळ माजली. या ठिकाणी पर्यटनाच्या नावाखाली चालणाऱ्या एका मोठ्या आणि धक्कादायक देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश झाल्यामुळे शहरात एक खळबळ माजली. वेळू परिसरातील प्रसिद्ध 'आमराई रिसॉर्ट'वर राजगड पोलिसांनी 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी धाड टाकत मोठी गौडबंगला उघडकीस आला. अवघ्या एक हजार रुपयांत परराज्यातील तरुणींकडून जबरदस्तीने हा व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे धक्कादायक सत्य बाहेर आलं. पोलिसांनी या कारवाईत 13 पीडित तरुणींची सुखरूप सुटका केली आहे. तर या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून या रिसॉर्टमध्ये रघु शेट्टी नावाचा व्यक्ती बाहेरून तरुणी आणून देहव्यापार चालवत असल्याची गोपनीय माहिती राजगड पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या माहितीची सत्यता पडताळण्यासाठी पोलिसांनी आधी एका बनावट म्हणजे डमी ग्राहकाला रिसॉर्टवर पाठवलं. तिथे पैशांची देवाणघेवाण होऊन अवैध प्रकार सुरू आहे हे लक्षात आल्यावर, पोलीस पथकाने संध्याकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास रिसॉर्टवर अचानक छापा टाकला आणि मोठी कारवाई केली.
छापेमारीदरम्यान रिसॉर्टच्या वेगवेगळ्या खोल्यांची तपासणी करण्यात आली. तिथे अवघ्या 1000 रुपयांमध्ये हा धंदा सुरू असल्याचे तपासात समोर आलं. पोलिसांनी घटनास्थळावरून तातडीने 13 तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामध्ये मुंबई आणि ठाण्यासह थेट दिल्ली, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक या राज्यांमधून आणलेल्या तरुणींचा समावेश आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या या तरुणींना जास्तीच्या पैशांचे आमिष दाखवून या घाणेरड्या धंद्यातील दलदलीत ओढलं जातं.
या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात वैभव बालाजी इंगळे आणि रघु शेट्टी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर पोलिसांनी वैभव इंगळे याला व्यक्तीला अटक केली आहे. दरम्यान याप्रकरणातील मुख्य सूत्रधार रघु शेट्टी हा पोलिसांची चाहुल लागताच पसार होण्यात यशस्वी झाला. आता पोलिसांचं एक पथक त्याच्या कसून शोध घेत आहे.
दरम्यान, ज्या 'आमराई रिसॉर्ट'वर ही कारवाई करण्यात आली, ते रिसॉर्ट एका प्रमुख राजकीय पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याच्या मालकीचे असल्याची चर्चा परिसरात जोरदार सुरू आहे. संबंधित पदाधिकाऱ्याने हे रिसॉर्ट चालवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला करारावर दिले होते का? आणि या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत? या सर्व बाजू पडताळून पाहण्यासाठी राजगड पोलिसांचे पथक सखोल तपास करत आहेत.