पुणे : पुण्यातल्या पुरंदरमधल्या गुळूंचे गावात आज काटेबारस यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. ज्योतिर्लिंग देवाच्या काटेबारस यात्रे निमित्त अनेक भक्तगणांनी बाभळीच्या काट्याच्या ढिगाऱ्यांमध्ये उड्या घेत आपला देव भेटीचा मार्ग खुला केला.हजारो भाविकांनी हा काटेबारसीचा थरार अनुभवला.
लोकांच्या अंगावर काटे आणणारी ही काटे बारस यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.या काट्यांच्या ढिगाऱ्यात लोक स्वतःच्या मर्जीनुसार उड्या घेतात,त्यांना कोणी जबरदस्ती करीत नाही. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा नसून तो एक प्रकारचा साहसी खेळ असल्याचे येथील लोक सांगतात.
या काटेबारसीच्या संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते, शंभू महादेवाची म्हणजेच ज्योतिर्लिंगाची बहीण आसावरी ही रुसून गेली होती. तिला आणायला गेलेल्या ज्योतिर्लिंग यांनी पश्चाताप म्हणून काट्यांच्या ढीगाऱ्यात लोळण घेतलं आणि तेव्हापासून ही प्रथा सुरू असल्याचे सांगितले जाते.
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध ताकई येथील बोंबल्या विठोबा मंदिरात कार्तिकी एकादशी निमित्त महापूजा संपन्न झाली... महापूजेनंतर कोकणातील खालापूरमधील प्रसिद्ध साजगावच्या यात्रेला सुरुवात झाली... पहाटेपासून विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या. ताकईच्या श्री विठोबा देवस्थानाच्या वतीने भाविकांचे स्वागत करण्यात आलेत... संपूर्ण मंदिर परिसर विठ्ठल नामाच्या जयघोषाने भक्तिमय झाला.
पंढरपूरमध्ये कार्तिक एकादशीचा सोहळा साजरा झाला. कार्तिकी एकादशीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपुरमध्ये दाखल झाले. दुष्काळाचे सावट या वारीवर असल्यामुळे भाविकांच्या संख्येमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळते. पहाटेपासूनच चंद्रभागेमध्ये स्नानासाठी भाविकांनी गर्दी केली. चंद्रभागेमध्ये पवित्र स्नान करून हे भाविक विठुरायाच्या पदस्पर्श आणि मुखदर्शन रांगेमध्ये जात असतात.