सांगली - पडळकरांच्या जत सोसायटी गटाच्या मतमोजणीदरम्यान मतपेटीत चिठ्ठी सापडल्याने खळबळ; आत लिहिलं होतं 'लिंगायत...'
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जत सोसायटी गटाच्या मतमोजणीला सुरुवात झाली असता, मतपेटीमध्ये पन्नास रुपयांची नोट आणि चिठ्ठी सापडली.
सांगली जिल्हा बँक निवडणुकीत भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या रणनितीला शह देत गोपीचंद पडळकर जत सोसायटी गटातून विजयी झाले असून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या विजयासह गोपीचंद पडळकरांनी सांगली जिल्हा बँकेत प्रवेश मिळवला आहे. दरम्यान मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा मतपेटीमध्ये 50 रुपयांची नोट आणि एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलं आहे जाणून घ्या.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जत सोसायटी गटाच्या मतमोजणीला सुरुवात झाली असता मतमोजणी अधिकाऱ्यांना मतपेटीमध्ये पन्नास रुपयांची नोट आणि चिठ्ठी सापडली. या
चिठ्ठीमध्ये काँग्रेस आमदार विश्वजीत कदम व खासदार विशाल पाटलांच्या बाबतीत टीकेचा मजकूर आहे.
हे ही वाचा - जयंत पाटलांना धक्का! सांगली जिल्हा बँक निवडणुकीत पडळकरांचा मोठा विजय; रणनिती भेदत जिल्हा बँकेत दणदणीत एंट्री
गोपीचंद पडळकर यांच्या मागे लिंगायत मतदार आहेत, त्यामुळे आमदार पडळकरांचा विजय होणार असा विश्वास त्यात व्यक्त करण्यात आला होता. तसंच विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांनी लिंगायत समाजाला दिलेला आश्वासन पाळलं नसल्याची खंतही या चिठ्ठीत व्यक्त करण्यात आली होती.
जनतेने टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम केला
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये जतच्या जनतेने टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम केला, अशी खोचक टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर यांचा एकतर्फी विजय झालेला आहे. 54 मतांनी पडळकर विजय झाले आहेत, सर्वपक्षीय निवडणूक होताना गोपीचंद पडळकर यांच्यासह सहा जागांवर निवडणूक झाली होती त्यामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या जत सोसायटी गटातील निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचा राज्याचे लक्ष लागून राहिलं होतं. अखेर निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या विनोद पवार यांचा दारुण पराभव करत जिल्हा बँकेत एन्ट्री केली आहे.
हे ही वाचा - निलेश लंकेंनी भाकरीच फिरवली! मातब्बर नेत्यांना शह, अहिल्यानगर जिल्हा बँकेत दणदणीत विजय; विखेंच्या कट्टर समर्थकाचा पराभव
विजयानंतर सदाभाऊ खोतांनी पडळकर यांना खांद्यावर घेत केला जल्लोष
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर आमदार सदाभाऊ खोत यांनी भाजपा आमदार पडळकर यांना चक्क खांद्यावर घेत जल्लोष केला. मिरज येथील मतदान केंद्रावर गोपीचंद पडळकर समर्थकांकडून एकच जल्लोष सुरू असताना आमदार सदाभाऊ खोत यांची देखील एंट्री झाली आणि त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी जल्लोष करत गोपीचंद पडळकर यांना खांद्यावर घेत मतदान केंद्राच्या बाहेर नेलं. यावेळी पडळकर यांनी डोळ्यावर गॉगल लावत,डॉन गाण्यावर ठेका धरला.