महाराष्ट्रात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भयानक प्रकार, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मतदाराचे अपहरण, काँग्रेस नेत्यावर गुन्हा दाखल
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मोठा गोंधळ झाला आहे. आमदार पडळकरांच्या गटातील मतदाराचे अपहरण झाले आहे. काँग्रेस माजी आमदारासह उमेदवारावर गुन्हा दाखल
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुक : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील राजकारण चांगलंच तापले आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जत सोसायटी गटातील मतदाराचे अपहरण झाल्याचा आरोप केला जात आहे.यावरून काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांच्यासह गोपीचंद पडळकर यांच्या विरोधातील उमेदवार विनोद पवार आणि बाजार समितीचे माजी सभापती सुजय शिंदे यांच्यावर उमदी पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणावरून माजी आमदार विक्रम सावंत यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जिल्हा बँक निवडणूकीत पराभव दिसत असल्याने गोपीचंद पडळकरांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. कोणत्याही प्रकारचं अपहरण झालेलं नसताना पोलिसांनी हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक सध्या सुरू असून 16 जागा बिनविरोध झाल्या आहेत. मात्र, पाच ठिकाणी निवडणूक होत असून गोपीचंद पडळकर यांच्या जत सोसायटी गटात देखील निवडणूक पार पडत आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय रिटर्न पॅटर्न
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय रिटर्न पॅटर्न पाहायला मिळाले. पुन्हा एकदा जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली एकत्रित येत जिल्हा बँकेत समविचारी पॅनल केलं आहे. 21 जागांपैकी जवळपास 17 जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे 4 ठिकाणी निवडणुका होणार आहेत. यात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जत सोसायटी गटाचा समावेश आहे, त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या मैदानात पडळकर विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार अशी लढत होणार आहे.