महाराष्ट्राला हादरवणारा घटनाक्रम! 22 व्या वर्षी लग्न, 25 व्या वर्षी Extramarital Affair अन् पुण्याहून माहेरी आल्यानंतर घात; प्रियकराने घरात घुसून..., संध्याकाळी ऊसाच्या फडात...
पुण्यातील शिक्षिकेचा करुण अंत झाला असून हा संपूर्ण घटनाक्रम हादरवून टाकणारा आहे. नेमकं या महिलेसोबत घडलं काय जाणून घ्या सविस्तरपणे...
वयाच्या 22 व्या वर्षी नात्यातील व्यक्तीसोबत लग्न झाल्यानंतर विवाहित असताना वयाच्या 25 व्या वर्षी विवाहबाह्यसंबंध ठेवणाऱ्या महिलेला पाच वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर तिच्याच प्रियकराने संपवल्याचा हादरवणारा प्रकार सांगलीमधील जत तालुक्यात घडला आहे. या प्रकरणाची सध्या पंचक्रोषीत चर्चा असून मयत महिला पुण्यात शिक्षिका म्हणून कार्यरत होती. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
कुठे घडला हा प्रकार?
प्रियकराने विवाहित प्रियसीचा खून केल्याची ही धक्कादायक घटना सांगलीच्या जत तालुक्यातल्या कंठी येथे घडली आहे. मयत महिला ही अवघ्या 30 वर्षांची असून तिचं नाव राजाक्का काशीराम खरात असं आहे. राजाक्काची हत्या करणाऱ्या संशयित प्रियकराचं नाव मनोज कोळेकर असं आहे. मनोजला राजाक्काची हत्या करण्यासाठी त्याच्या एका साथीदाराने मदत केल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं आहे.
पुण्यात शिक्षिका म्हणून करायची काम
राजाक्काचं माहेर जत तालुक्यातील वाघेवाडी येथे आहे. आठ वर्षांपूर्वी राजाक्काचा विवाह नात्यामधूनच असलेल्या काशीराम खरात यांच्याशी झाला. राजाक्काची आई-वडीलही तिच्या लग्नानंतर कंठी येथे वास्तव्यास आले. राजक्का ही उच्चशिक्षित होती. पुण्यातील एका खासगी शिक्षणसंस्थेत ती शिक्षिका म्हणून कार्यरत होती. ती खासगी क्लासेस घेत होती. 10 दिवसांपूर्वी राजाक्का दिवाळीत दिवाळीच्या सुट्टी निमित्ताने आपल्या मूळगावी कंठी येथे आली होती.
भेटायला नकार अन् थेट घरी पोहोचला
राजाक्काचे पाच वर्षांपासून कंठी गावातील तरुण मनोज कोळेकरसोबत प्रेमसंबंध होते. यातून गावी आलेल्या राजाक्काला भेटण्यासाठी आणि प्रेमसंबंधांसाठी मनोजने तिच्याकडे तगादा लावला होता. मात्र अचानक राजक्काने लग्न झाल्याचे कारण सांगून त्याला भेटायला नकार दिला. संबंधित तरुणाने राजक्काला अनेकदा फोन केले. मात्र वारंवार फोन करुनही फोन न उचलल्याने आणि भेटीस नकार दिल्याने आरोपी रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास राजक्काच्या घरी पोहोचला.
पोटावर चाकूने वार
अचानक आरोपी मनोज घरी आल्याने राजक्काला धक्काच बसला. दोघांमध्ये भेट टाळण्यावरुन वादावादी झाली. याच रागातून संशयित मनोज कोळेकरने राजाक्काच्या घरातच तिच्यावर हल्ला केला. मनोजने धारदार शस्त्राने वार करून राजाक्काचा निर्घृण खून केला आहे. आरोपीने राजक्का यांच्या पोटावर आणि शरीरावर धारधार शस्राने सापसप वार केले. गंभीर जखमी झालेल्या राजक्काचा जागीच मृत्यू झाला.
गुन्हा केल्यानंतर ऊसाच्या फडात...
याप्रकरणी जत पोलिसांनी गतीने तपास करत संशयित मनोज कोळेकरला ताब्यात घेतले असून अधिक तपास जत पोलीस करत आहेत. माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली उपविभागीय पोलीस अधिकारी संजय थोरबोले आणि पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांनी घटनास्थळाची पहाणी केली आहे. रात्री उशीरा आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. संशयीत आरोपी दारूच्या नशेत होते आणि गुन्हा केल्यानंतर संध्याकाळपासून ते पोलिसांनी ताब्यात घेईपर्यंत आरोपी ऊसाच्या फडात लपून बसले होते.