गोकुळवर सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीची सत्ता; महाराष्ट्रापासून दिल्लीत सत्तेत असलेल्या महायुतीला मोठा धक्का
गोकुळ दूध संघ निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीनं दणदणीत विजय मिळवत महायुतीला पराभवाचे पाणी पाजले आहे.
Gokul Election Result : राज्यभर चर्चेत असलेल्या गोकुळ दूध संघ निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीनं महायुतीला जोरदार धक्का दिला आहे. गोकुळवर सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीची सत्ता आली आहे. सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने 13 जागा जिंकल्या आहेत. तर, 12 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहे. एका आकड्याने या निवडणुकीचा सर्व डाव उलटला आहे.
एकूण 25 संचालकांच्या जागांसाठी 50 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी 99.88 टक्के मतदान पार पडलं. जवळपास 5 हजार 416 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, जिल्ह्यातील महायुतीचे आमदार आणि समविचारी आघाडीचे नेते सतेज पाटील या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली. गोकुळचा गुलाल कोण उधळणार, याकडे लक्ष लागले होते.
ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस नेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते, मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. सुरुवातील महायुतीच्या पॅनलं आघाडी घेतली होती. मात्र, सतेज पाटलांच्या पॅनलनं मुंसडी मारत मतमोजणीत आघाडी घेतली. आबाजी पाटील आणि युवराज पाटील या दोन्ही अर्ज नामंजूर झाले. अखेरीस सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीचे 13 उमेदवार विजयी ठरले. सतेज पाटील यांनी गोकुळची निवडणुक जिंकत महायुतीला पराभवाचे पाणी पाडले आहे.
सतेज पाटील मतमोजणी केंद्रावर ठाण मांडून बसले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून निकाल जाहीर करण्यासाठी मुद्दाम उशिरा केला जात आहे, असा आरोप सतेज पाटलांनी केलाय. पॅनलनं आघाडी घेताच सतेज पाटलांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.
अनेक दिग्गजांचा पराभव
गोकुळच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. महायुतीच्या नेत्या शौमिका महाडिक, माजी अध्यक्ष नावेद मुश्रीफ, अरुण डोंगळे, विश्वास पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आहे. गोकुळ दूध संघ निवडणुकीत महायुतीला दुहेरी धक्का बसला आहे. हसन मुश्रीफांचे पुत्र नावेद मुश्रीफांचा पराभव झाला. शौमिका महाडिक यांचाही पराभव झाला. शौमिका महाडिकांकडून फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली होती. मात्र, फेर मतमोजणीतही शौमिका महाडिकांचा पराभव झाला आहे.