गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत समविचारी आघाडीनं बाजी मारली. पण अध्यक्षपदाचा तिढा सुटताना दिसत नाही. त्यामुळं 10 नोव्हेंबरला अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं दिलेत. त्यातच आता गोकुळमध्ये चार शासकीय सदस्यांची नियुक्तीचा करण्यात आली असून, कॅबिनेटमध्ये या निर्णयाला मान्यता मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र या सदस्यांना अध्यक्ष निवडीत मतदानाचा अधिकार मिळणार का, याबाबत मात्र अद्याप स्पष्टता नाही. पण यामुळे आता गोकुळमधील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. कारण सतेज पाटील यांनी लोकांचा जनाधार नाकारत असाल तर रस्त्यावर उतरायची तयारी ठेवली असल्याचा इशारा दिला आहे.
गोकुळच्या शासन नियुक्त संचालकपदी शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफ, अशोक फराकटे, बाळासाहेब खाडे आणि ए.वाय.पाटील या नावांची चर्चा आहे. पाच पैकी चौघांची नावे गोकुळच्या शासन नियुक्त संचालक पदी निश्चित होण्याची शक्यता आहे.
महायुतीच्या 12 संचालकांनी निवड प्रक्रियेला उपस्थित राहावंच, असे निर्देश न्यायालयानं दिलेले नाहीत. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर समविचारी आघाडीनंही कायदेशीर तयारी सुरू केली आहे. 10 नोव्हेंबरला अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याच्या निर्णयाविरोधात कोणी सर्वोच्च न्यायालयात गेल्यास, आपली बाजू ऐकून घेतल्याशिवाय एकतर्फी निर्णय देऊ नये, यासाठी सतेज पाटलांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलं आहे. तर समविचारी आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी आज थेट राज्यातील संपादक आणि पत्रकारांना पत्र लिहिलं आहे. गोकुळमधील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा कौल डावलला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
जनतेने दिलेल्या कौलाला तांत्रिक कारणांनी रोखले जात असेल, तर निवडणुकीचा अर्थ काय राहतो?गोकुळमधील बहुमतासाठी कायद्यात बदल करण्याची किंवा खास नियोजित पद्धतीने संचालकांना अधिकार देण्याची चर्चा लोकशाहीसाठी धोकादायक आहे. लोकनियुक्त मंडळ गोकुळमध्ये अस्तित्वात नसणे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणं आहे. शेतकऱ्यांचा कौल स्वीकारून विरोधी संचालकांनी पुढील सभेला उपस्थित राहावं आणि लोकशाही प्रक्रियेला सहकार्य करावं. आज गोकुळमध्ये जे घडत आहे, ते उद्या कोणत्याही संस्थेत घडू शकतं. महाराष्ट्रातील सहकार चळवळीच्या गाभ्याला धक्का दिला जातोय असं सतेज पाटलांनी पत्रात लिहिलं आहे.
गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सतेज पाटील यांनी याआधी विधान करताना आक्रमक भूमिका घेतली होती. "जे काही कायदेशीर मार्ग आहेत ते सर्व मी अवलंबणार आहे, मी गप्प बसणार नाही साडेपाच लाख शेतकऱ्यांनी हा कौल दिलेला आहे. लोकांचा जनाधार नाकारत असाल तर रस्त्यावर उतरायची तयारी ठेवलेली आहे," असा इशारा त्यांनी दिला आहे.
"पूर्ण बहुमत असून सुद्धा केवळ कोरम पूर्ण करण्यासाठी दोन संचालकांचा पाठिंबा मागत आहेत. हे महायुतीचे हस्त्यास्पद विधान आहे.. तसे असेल तर आमचे महानगरपालिकेत पाच नगरसेवक कमी आहेत, महायुतीने आम्हाला पाठिंबा द्यावा आणि महापौर आमचा करावा," असा टोलाही त्यांनी लगावला.
"जर विरोधी पक्षात राहण्याचा मतदारांनी आपल्याला कौल दिलाय तर तो तुम्ही स्वीकारला पाहिजे. माझ्या पत्रकाला काहीतरी उत्तर द्यावा म्हणून त्यांनी हे काढले आहे. या पत्रकावर सह्या कोणी करायच्या यावरून सुद्धा महायुतीत वाद झालेला आहे," असा दावा त्यांनी केला.