SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

कोल्हापुरात सतेज पाटलांना धक्का! गोकुळवर सरकारचे 4 संचालक नेमणार, कॅबिनेट बैठकीत मंजुरी, म्हणाले 'मी गप्प बसणार नाही, रस्त्यावर...'

गोकुळमध्ये चार शासकीय सदस्यांची नियुक्तीचा करण्यात आली असून, कॅबिनेटमध्ये या निर्णयाला मान्यता मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 04, 2026, 02:17 PM IST | Updated: Nov 04, 2026, 02:31 PM IST
Image Credit: गोकुळवर सरकारचे 4 संचालक नेमणार, कॅबिनेट बैठकीत मान्यता
Join

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत समविचारी आघाडीनं बाजी मारली. पण अध्यक्षपदाचा तिढा सुटताना दिसत नाही. त्यामुळं 10 नोव्हेंबरला अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं दिलेत. त्यातच आता गोकुळमध्ये चार शासकीय सदस्यांची नियुक्तीचा करण्यात आली असून, कॅबिनेटमध्ये या निर्णयाला मान्यता मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र या सदस्यांना अध्यक्ष निवडीत मतदानाचा अधिकार मिळणार का, याबाबत मात्र अद्याप स्पष्टता नाही. पण यामुळे आता गोकुळमधील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. कारण सतेज पाटील यांनी लोकांचा जनाधार नाकारत असाल तर रस्त्यावर उतरायची तयारी ठेवली असल्याचा इशारा दिला आहे.

गोकुळच्या शासन नियुक्त संचालकपदी शौमिका महाडिक,  नवीद मुश्रीफ, अशोक फराकटे,  बाळासाहेब खाडे आणि ए.वाय.पाटील या नावांची चर्चा आहे. पाच पैकी चौघांची नावे गोकुळच्या शासन नियुक्त संचालक पदी निश्चित होण्याची शक्यता आहे.

महायुतीच्या 12 संचालकांनी निवड प्रक्रियेला उपस्थित राहावंच, असे निर्देश न्यायालयानं दिलेले नाहीत. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर समविचारी आघाडीनंही कायदेशीर तयारी सुरू केली आहे. 10 नोव्हेंबरला अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याच्या निर्णयाविरोधात कोणी सर्वोच्च न्यायालयात गेल्यास, आपली बाजू ऐकून घेतल्याशिवाय एकतर्फी निर्णय देऊ नये, यासाठी सतेज पाटलांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलं आहे. तर  समविचारी आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी आज थेट राज्यातील संपादक आणि पत्रकारांना पत्र लिहिलं आहे. गोकुळमधील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा कौल डावलला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

गोकुळमध्ये लोकशाहीची गळचेपी? सतेज पाटलांचं पत्र!

जनतेने दिलेल्या कौलाला तांत्रिक कारणांनी रोखले जात असेल, तर निवडणुकीचा अर्थ काय राहतो?गोकुळमधील बहुमतासाठी कायद्यात बदल करण्याची किंवा खास नियोजित पद्धतीने संचालकांना अधिकार देण्याची चर्चा लोकशाहीसाठी धोकादायक आहे. लोकनियुक्त मंडळ गोकुळमध्ये अस्तित्वात नसणे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणं आहे. शेतकऱ्यांचा कौल स्वीकारून विरोधी संचालकांनी पुढील सभेला उपस्थित राहावं आणि लोकशाही प्रक्रियेला सहकार्य करावं. आज गोकुळमध्ये जे घडत आहे, ते उद्या कोणत्याही संस्थेत घडू शकतं. महाराष्ट्रातील सहकार चळवळीच्या गाभ्याला धक्का दिला जातोय असं सतेज पाटलांनी पत्रात लिहिलं आहे.

'मी गप्प बसणार नाही'

गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सतेज पाटील यांनी याआधी विधान करताना आक्रमक भूमिका घेतली होती. "जे काही कायदेशीर मार्ग आहेत ते सर्व मी अवलंबणार आहे, मी गप्प बसणार नाही साडेपाच लाख शेतकऱ्यांनी हा कौल दिलेला आहे. लोकांचा जनाधार नाकारत असाल तर रस्त्यावर उतरायची तयारी ठेवलेली आहे," असा इशारा त्यांनी दिला आहे.

"पूर्ण बहुमत असून सुद्धा केवळ कोरम पूर्ण करण्यासाठी दोन संचालकांचा पाठिंबा मागत आहेत. हे महायुतीचे हस्त्यास्पद विधान आहे.. तसे असेल तर आमचे महानगरपालिकेत पाच नगरसेवक कमी आहेत, महायुतीने आम्हाला पाठिंबा द्यावा आणि महापौर आमचा करावा," असा टोलाही त्यांनी लगावला.

"जर विरोधी पक्षात राहण्याचा मतदारांनी आपल्याला कौल दिलाय तर तो तुम्ही स्वीकारला पाहिजे. माझ्या पत्रकाला काहीतरी उत्तर द्यावा म्हणून त्यांनी हे काढले आहे. या पत्रकावर सह्या कोणी करायच्या यावरून सुद्धा महायुतीत वाद झालेला आहे," असा दावा त्यांनी केला.

 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES