'भाजपाकडून पैसेवाटपासाठी स्पायकॅम असलेल्या पेनचा...', सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप; थेट CMO ला केलं टॅग! मतदानकेंद्रातील Video ही केला पोस्ट
आज पदवीधर मतदारसंघांसाठी मतदान होत आहे. मात्र यासंदर्भात सुप्रिया सुळेंनी काही आक्षेप नोंदवले असून थेट निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग केलं आहे. सुप्रिया यांचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घ्या...
पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मात्र या मतदानादरम्यान भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केला आहे. त्यांनी निवडणुकीच्या आदल्या दिवशीपासूनच कशाप्रकारे एका ठराविक उमेदवारासाठी फोन केले जात आहेत याबद्दल आक्षेप घेतला आहे. आज मतदानाच्या दिवशी सुप्रिया यांनी दोन पोस्ट केल्या आहेत.
"पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाकडून पैसेवाटपासाठी स्पायकॅम असलेल्या पेनचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मतदारांच्या खिशाला असे पेन लावून, भाजपाच्या उमेदवाराला मतदान केल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आणि मतदानानंतर तो दाखविल्यावर ठरलेले पैसे द्यायचे, असा प्रकार सुरू असल्याचे मतदार सांगत आहेत," असं सुप्रिया यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे. "या तक्रारी अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहेत. मतदानाची गोपनीयता आणि मतदारांचे स्वातंत्र्य धोक्यात आणणाऱ्या या प्रकाराची निवडणूक आयोगाने व शासनाने तातडीने दखल घेऊन सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी," अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. तसेच, "लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासणारे असे प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेता कामा नयेत. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडलीच पाहिजे," अशी अपेक्षा सुप्रिया यांनी व्यक्त केली असून या पोस्टमध्ये मुख्यमंत्री कार्यालय आणि निवडणूक आयोगाला टॅग केलं आहे.
अन्य एका पोस्टमध्ये सुप्रिया यांनी मतदान केंद्रातील एक व्हिडीओ पोस्ट केला असून यामध्ये पक्षाची ओळख पटेल अशापद्धतीने मतदार मतदानकेंद्रात जाऊन मतं देत असल्याचं म्हटलं आहे. "शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा मतदान करतानाचा हा व्हिडिओ पहा. मतदान केंद्रावर पक्षीय ओळख बाजूला ठेवून एक सामान्य मतदार म्हणून जाणे अपेक्षित असते. लोकशाहीच्या या पवित्र प्रक्रियेचे पावित्र्य आणि मतदान केंद्राची निष्पक्षता प्रत्येकाने जपली पाहिजे. उमेदवाराला पक्षाचे चिन्ह गळ्यात परिधान करुन मतदान केंद्रावर प्रवेश कसा दिला? ही सवलत केवळ सत्ताधारी उमेदवारालाच का दिली जाते? हा आदर्श आचारसंहितेचा भंग नाही का?" असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला आहे.
"तुम्ही सदर उमेदवारांवर नेमकी कोणती कारवाई करणार आहात याचे उत्तर महाराष्ट्र शासन, निवडणूक आयोगाने दिले पाहिजे," असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.