महाराष्ट्रात आणखी एक वंदे-भारत स्लीपर धावणार? पुणे ते नागपूर...
महाराष्ट्रातून धावणारी ही पहिलीच वंदे भारत एक्स्प्रेस ही मुंबई-बेंगळुरू आहे. त्याबरोबर पुणे-नागपूर वंदे भारत बाबत महत्त्वाची माहिती समोर येतेय.
मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपर सुरू झाल्यानंतर आता प्रवाशांना वेध लागलेत ते पुणे-नागपूर वंदे भारत स्लीपरचे. नागपूर आणि पुणे या दरम्यान दोन महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी ही एक्स्प्रेस महत्त्वाची आहे. नागपूर ते पुणे प्रवासासाठी सध्या वंदे भारत चेअरकार प्रकारातील रेल्वे धावत आहे.
पुणे ते नागपूर मार्गावर वंदे भारत चेअरकार धावत आहे. मात्र या वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवासासाठी 12 तास लागतात. त्यामुळं सुरुवातीलाच या मार्गावर स्लीपर वंदे भारत सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. प्रवासाचा कालावधी आठ तासांपेक्षा अधिक असल्याने स्वीपर कोचची मागणी करण्यात आली होती. मात्र दिवसा प्रवास असल्याने वंदे भारत चेअरकार सुरू करण्यात आली.
दरम्यान आता हाती आलेल्या माहितीनुसार, नागपूर-पुणे दरम्यान प्रस्तावित स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये एकूण 16 डबे असतील. या गाडीत थ्री टायर एसी, टू टायर एसी आणि फर्स्ट क्लास एसी अशा तीन श्रेणींचा समावेश असू शकतो. स्लीपर वंदे भारतमध्ये आधुनिक आसन व्यवस्था, आरामदायी शयनयान सुविधा, प्रवाशांच्या सोयीसाठी विविध आधुनिक सुविधा असतील.
सध्या पुणे ते नागपूर दरम्यान पुणे-अजनी वंदे भारत एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 26101/26102) ही चेअर कार (CC/EC) स्वरूपातील सेमी-हायस्पीड ट्रेन नियमित धावत आहे. ही ट्रेन आठवड्यातून 6 दिवस धावते. पुणे ते नागपूर प्रवासास साधारण 12 तास लागतात.
कोणत्या स्थानकांत थांबते
नागपूर- पुणे मार्गावरील सध्याच्या वंदे भारत एक्स्प्रेसला अजनी, वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, पुणतांबा आणि दौंड या स्थानकांवर थांबे आहेत. ज्यामुळं विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या शहरांना पुण्याशी थेट संपर्क झाला आहे.
वंदे-भारत स्लीपरला कुठे असतील थांबे!
वंदे भारत स्लीपर सुरू केल्यानंतर नागपूर आणि पुण्यासह वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, भुसावळ आणि अहिल्यानगर परिसरातील प्रवाशांनाही लाभ होईल. कारण पुण्यात शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने अनेक जण स्थायिक झाले आहेत. त्यांच्यासाठी ही एक्सप्रेस महत्त्वाची आहे.
मुंबई-बंगळुरू सारख्या मार्गांवर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाल्यानंतर, पुणे-नागपूर मार्गावरही लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी स्लीपर (Sleeper) वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची प्रवाशांची आणि संघटनांची मोठी मागणी आहे.