बारामतीमध्ये दोन महिलांची गळा चिरुन हत्या; सुनेत्रा पवारांनी घेतली दखल, म्हणाल्या, 'आरोपींना...'
बारामती तालुक्यातल्या शेरेवाडी मध्ये दोन वयोवृद्ध महिलांचा खून करण्यात आला. रात्री झोपेत असतानाच अज्ञात व्यक्तीकडून दोघींचा खून केला.
बारामती तालुक्यातील शेरेवाडी येथे मध्यरात्री दोन महिलांची गळा चिरून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कृष्णाबाई लडकत आणि इंदुमती लडकत अशी मृत महिलांची नावे आहेत. या दुहेरी हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या हत्येमागील कारण तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी तपास सुरू असून, परिसरातील माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.
सुनेत्रा पवारांनी घेतली दखल
सुनेत्रा पवारांनी या घटनेची दखल घेतली असून, आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत या घटनेप्रकरणी दु:ख व्यक्त केलं आहे. बारामती तालुक्यातील शेरेवाडी येथे दोन वृद्ध महिलांच्या हत्येची घटना अत्यंत दुःखद आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
शेरेवाडी (बाबुर्डी) येथे घराच्या ओसरीत झोपलेल्या दोन महिलांची धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली आहे. घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, आरोपीचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळी मिळालेले पुरावे आणि इतर सर्व बाबींच्या आधारे तपास सुरू आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
या दुःखद घटनेत मृत्यू झालेल्या दोन्ही महिलांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. तपासातून घटनेमागील नेमकं कारण आणि संबंधित व्यक्तींची माहिती लवकरच समोर येईल, अशी अपेक्षा आहे असंही त्यांनी सांगितलं आहे.
बारामतीच्या माळेगाव येथील राजहंस चौकात दोन युवकांवर टोळक्याचा हल्ला
बारामती तालुक्यातील माळेगाव येथील राजहंस चौकात अनिकेत धुमाळ आणि पप्पू जगताप या दोन युवकांना एका टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी दोन्ही युवकांवर कोयत्याने वार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात दोन्ही युवक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून, त्यामध्ये युवकांवर हल्ला होत असल्याचे दिसून येत आहे. सायंकाळी सुमारे 8 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडल्याने माळेगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
गजबजलेल्या राजहंस चौकात कोयत्याने हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींवर पोलिसांचा वचक राहिला आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून हल्लेखोरांवर काय कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.