पुण्यातील पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात तिचा नवरा अक्षय झांबरेला अटक केल्यानंतर सासू - सासऱ्यालाही अटक करण्यात आली आहे. अक्षयला शिवाजीनगर कोर्टात हजर केलं असता त्याला 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर सासू सासऱ्यालाही शिवाजीनगर कोर्टात 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अरविंद झांबरे (सासरा) आणि मंगल झांबरे (सासू) असं त्यांचं नाव असून त्यांच्या वकिलांनी धक्कादायक युक्तीवाद केला आहे. शिवाजीनगर कोर्टात सुनावणीदरम्यान काय खुलासे झाले याबद्दल पालयचे वकील पुष्कर पाटील यांनी माहिती दिली आहे.
पायल झांबरेच्या सासू - सासऱ्याला कोर्टात हजर केल्यावर दोन्ही पक्षाकडून युक्तीवाद करण्यात आला. त्यात पायलचे वकील पुष्कर पाटील यांनी सांगितलं की, आरोपीच्या वकिलांकडून असं म्हणणं होतं जे त्यांनी न्यायालयासमोर मांडलं भाकरी नीट केली नाही यावरून सासू - सुनेचा वाद झाला म्हणून या कारणाने त्यांनी आत्महत्या केली. त्यावर आम्ही असा युक्तीवाद केला की, जेव्हा एखादी स्त्री मुलाला जन्म देते तो त्रास भाकरी करण्यापेक्षा जास्त कठीण असतो.
पुढे आरोपीच्या वकिलाने सांगितलं की, ते खूप श्रीमंत लोक आहेत आणि श्रीमंत लोक असं करत नाहीत. त्यावर आम्ही युक्तीवाद केला की, ते श्रीमंत आहेत म्हणून असं करतील असं कोणी लायसन्स दिलं नाहीय, असं करण्याचं. या प्रकरणाची सखोल चौकशी आणि तपास होणे गरजेचे आहे.
महत्त्वाचे म्हणजे सासू - सासऱ्याला दुपारी दीड वाजता अटक झाली. त्यानंतर त्यांना कोर्टात पाच वाजता हजर करण्यात आलं. त्यामुळे पोलिसांना चौकशी करायला पूरेसा वेळ मिळाला नाही. त्यासोबत त्यांचे मोबाईल जप्त झालेले नाही. त्या ठिकाणाचे सीसीटीव्ही जप्त करण्यात आलेले नाही. मुळात पाहता चार भिंतीमध्ये नेमकं त्या दिवशी काय झालं याचा तपास करण्यासाठी जास्त जास्त पोलीस कोठडीची त्यांना गरज आहे. दरम्यान नणंद अजून अटक झाली नाही आहे. आम्हाला पोलिसांवर आणि न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे.
त्यासोबत महत्त्वाचे म्हणजे पायलने तिचा भाऊ ऋषिकेशला मेसेज केला होता की, सासू जबाबदार आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने कोर्टाने पायलचा नवरा अक्षयसह सासू सासऱ्याला 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.