दिवाळीच्या तोंडावर मिठाई विक्रेत्यांना FDAचा दणका! 3193 किलो मोतीचूर लाडू, बुंदी व बर्फीमध्ये भेसळ
दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासनाकडून पुणे विभागाने पाच जिल्ह्यांत मिठाई विक्रेत्यांना दणका दिला आहे. 1,491 किलो मिठाईचा साठा नष्ट केला आहे.
दिवाळी म्हटलं की, मिठाई विक्रेत्यांची चांदीच चांदी असते. सगळ्यात जास्त मिठाईचा खप दिवाळीच्या दिवसांमध्ये होते. त्यामुळ दुकानदार मोठ्या प्रमाणात मिठाई तयार करतात. पण दुसरीकडे अन्न व औषध प्रशासनाची धुरी आयुक्त तुकाराम मुंडेंकडे आली आहे. त्यांनी ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेत राज्यात कारवाईचा धडका लावला आहे.
कुठे झाली कारवाई?
अशातच दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासनाकडून पुणे विभागाने पाच जिल्ह्यांत मिठाई विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई केली आहे. पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत मिठाई, दुग्धजन्य पदार्थ आणि फरसाण विक्रेत्यांची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त मिठाई सापडली आहे.
कुठल्या जिल्ह्यांमध्ये कारवाई?
या कारवाई अतर्गंत पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूरमध्ये 15 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये एकूण 3 हजार 193 किलो खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तर या जप्त साठ्याची अंदाजे किंमत 16 लाख 93 हजार 295 रुपये इतकी आहे.
1 हजार 440 किलो खाद्यपदार्थ जागेवरच नष्ट
तर अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जप्त केलेल्या मिठाईपैकी 1 हजार 440 किलो खाद्यपदार्थ जागेवरच नष्ट केला आहे. तर नष्ट केलेल्या खाद्यपदार्थांची किंमत 4 लाख 35 हजार 200 रुपये एवढी होती. तर या कारवाई दरम्यान 8 आस्थापनांचे परवाने तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले. तर 3 अन्न आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुण्यातील कराची स्वीट मार्ट, शिक्रापूरमधील श्री गणेश लाडूवाले, मंचरमधील राजमिलन स्वीट्सवर कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील बिकानेर मिठाईवाल्यांकडील 268 किलो बर्फी जप्त करून नष्ट केली आहे. तर सांगलीतील आशिष ट्रेडर्सकडून 749 किलो बदामांचा साठा जप्त केला आहे. या जप्त केलेल्या साठ्याची किंमत 8 लाख 98 हजार 800 रुपये एवढी सांगण्यात येत आहे. निकृष्ट दर्जा, अयोग्य साठवणूक, अस्वच्छता आणि लेबलिंगमधील त्रुटींमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. तर या कारवाईनंतर अन्नसुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन FDA कडून व्यावसायिकांना करण्यात आले आहे.