बिलं काढली, खड्डे खोदले पण झाडं लावलीच नाहीत, पुण्यात 12 कोटींचा वृक्षलागवड घोटाळ्याचा आरोप
पुण्यातील काही टेकड्यावरती जिथे वृक्षलागवड करता येऊ शकते, अशा ठिकाणी वृक्षलागवड केल्याचं दाखवण्यात आलं आहे.
पुणे वनविभागात 'मियावाकी' वृक्षारोपणांतर्गत प्रत्यक्ष जागेवर जुनी झाडे अस्तित्वात असतानाच, तेथे खड्डे खोदल्याचे आणि खत पसरवल्याचे दाखवून मार्चमध्ये बिले काढली. मात्र, प्रत्यक्षात मे महिन्यात जुनी झाडे काढल्याची धक्कादायक माहिती अधिकारातून उघड झाली आहे. यामुळे सुमारे 68 हेक्टर वनजमिनीवर राबविण्यात येणाऱ्या साडे 12 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता.
पुणे वनविभागाच्या हद्दीतील पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, वेताळ टेकडी, वेल्हे, नसरापूर, शिरोटा, इंदापूर, सासवड, वडगाव मावळ आणि पौड येथील राखीव वनजमिनींवर 'मियावाकी' पद्धतीने वृक्षारोपण करण्याचे नियोजन आहे. संपूर्ण प्रकल्पाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
दरम्यान, पुणे उपसंरक्षक वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले यांनी यासंबंधीचे सर्व आरोप फेटाळून लावलेत. तसंच शासनाच्या धोरणानुसारच ग्लिसीरिडिया झाडं तोडून त्याठिकाणी मियावाकी पद्धतीने हे वृक्षारोपण सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
वृक्ष लागवडीच्या नावाखाली साडेबारा कोटी रुपयांची खोटी बिलं पुणे वनविभागाकडून काढण्यात आल्याचं समोर आलंय. जानेवारी ते मार्च या कालावधीत वृक्षलागवडीची ही कामे झाल्याचं दाखवण्यात आलं आणि 31 मार्चला एकाच दिवसात साडेबारा कोटींची ही बिलं अदा करण्यात आली. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात मे महिन्यात करण्यात आली .
पुण्याचे वन सरंक्षक आशिष ठाकरे यांनी या वृक्षलवाडीबाबतचे प्रस्ताव 18 ते 25 मार्च या दरम्यान सरकाकडे पाठवल्याचे पुरावे उपलब्ध आहेत . मात्र कामे जानेवारी महिन्यापासून सुरु असल्याचं बिलांवरून दिसून येतंय. साडे बारा कोटी रुपये खर्च करून पुण्यात 68 हेक्टरवर दोन कोटी चार हजार झाडे लावल्याचं वन विभागाने जाहीर केलंय. पुण्यातील तळजाई टेकडी , वेताळ टेकडी , रामटेकडी यासारख्या बारा ठिकाणी ही झाडं लावल्याचा वन विभागाचा दावा आहे.
मात्र वन विभागाचा वृक्षलागवडीचा हा तपासला असता अनेक ठिकाणी उघड्यावर टाकलेली रोपे सुकून गेल्याच दिसून येतंय . त्याचबरोबर ज्या रोपांची लागवड करण्यात आली त्यातील बहुतांश रोपे देखील सुकून गेलीयत. आश्चर्य म्हणजे वन विभागाने गुलाब , पेरू, लिंबू यासारखी झाडं लावल्याचा दावा केलाय. विशेष म्हणजे या सर्व बारा ठिकाणी ग्लिरिसिडिया प्रजातीची तीस ते चाळीस वर्षे जुनी झाडे असताना त्याच ठिकाणी ही वृक्षलागवड केल्याचं दाखवण्यात आलंय . त्यासाठी ग्लिसरिडियाची तीस ते चाळीस वर्षे जुनी झाडे तोडण्यात आली.
साडेबारा कोटींची कामे करण्यासाठी न कोणती निविदा काढण्यात आली न त्या कामांचे दरपत्रक जाहीर करण्यात आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुरु असलेल्या या अनागोंदीला पुणे वनविभागात कार्यालय अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या जालंदर पाटील यांनी विरोध केला. वन विभागाच्या बैठकीत त्यांनी त्याबद्दलचा आक्षेप नोंदवला. मात्र त्याचा राग मनात ठेऊन जालंदर पाटील यांना निलंबित करण्यात आलं आहे.
पर्यावरण प्रेमींच्या मागण्या काय?
1. संपूर्ण 68 हेक्टर क्षेत्रावरील कामांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी.
2. चौकशी पूर्ण होईपर्यंत मियावाकी प्रकल्पाला तत्काळ स्थगिती द्यावी.
3. 'मियावाकी'च्या नावाखाली जुनी झाडे तोडण्यात येऊ नयेत.
4. या बँकडेटेड बिलं वृक्षारोपण घोटाळ्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी