गोकुळनंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकडे लक्ष; आर्थिक सत्तेची लढाई, राजकीय वर्चस्वाची परीक्षा
गोकुळनंतर सर्वांचं लक्ष लागलंय ते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकडे. गोकुळच्या निकालाचे पडसाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमटणार का? याची जोरदार चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनं मोठी उलथापालथ घडली. आमदार सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीनं 13 जागा जिंकत महायुतीला रोखलं. तर महायुतीला 12 जागांवर समाधान मानावं लागलं. आता गोकुळनंतर सर्वांचं लक्ष लागलंय ते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकडे. गोकुळच्या निकालाचे पडसाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमटणार का? याची जोरदार चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सहकारी संस्थांच्या निवडणुका म्हणजे केवळ सत्तेची लढाई नाही, तर जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाची परीक्षाच असते. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीनं 13 जागा जिंकत आपलं वर्चस्व सिद्ध केलं, तर मंत्री, खासदार आणि आमदारांची ताकद पणाला लावणाऱ्या महायुतीला 12 जागांवर समाधान मानावं लागलं. या निकालानंतर आता जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचं लक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकडे लागले आहे.
जिल्हा बँक ही शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे या बँकेवरील सत्ता म्हणजे केवळ संचालक मंडळावरील नियंत्रण नसून जिल्ह्यातील सहकाराच्या राजकारणात प्रभाव निर्माण करण्याची संधीही आहे. गोकुळच्या निवडणुकीत महायुतीतील नेत्यांची एकजूट, स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याची क्षमता या मुद्द्यांची चर्चा झाली. त्यामुळे निवडणूक होवू घातली असताना त्यामुळे बँकेच्या निवडणुकीत नेमक काय घडणार यावर आत्ताच कोणी बोलायला तयार नाही.
गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीला चितपट करणारे काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी देखील कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीसंदर्भात वेट आणि वॉच भूमिका घेतली आहे. इतकंच नव्हे तर जिल्हा बँकेची निवडणूक पुढे जाण्याची शक्यता वर्तवून यावर अधिक भाष्य करणे टाळले आहे.
गोकुळमध्ये सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीनं मिळवलेल्या यशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे, मात्र, जिल्हा बँकेची निवडणूक ही वेगळ्या स्वरूपाची आहे. बँकेची मतदार रचना, सहकारी संस्थांमधील प्रतिनिधित्व, निवडणुकीचे नियम आणि स्थानिक नेत्यांची भूमिका या बाबी निकालावर प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे गोकुळचा निकाल म्हणजे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल असेल, असं थेट समीकरण मांडता येणार अस राजकीय अभ्यासकांना वाटत आहे.
दुसरीकडे, महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोणती भूमिका घेतात, याकडेही लक्ष असेल. गोकुळच्या निकालानंतर महायुतीतील नेत्यांमध्ये आत्मपरीक्षणाची चर्चा सुरू असताना जिल्हा बँकेसाठी जागावाटप आणि नेतृत्वाचा निर्णय कसा होतो, रिझर्व बँकेच्या नव्या निकषामुळे अनेक दिग्गज नेत्यांना घरी बसावं लागल्यामुळे त्यांच्या कडून कोणत्या वारसाला निवडणूक रिंगणात उतरलं जातं यावर जिल्हा बँकेचे गणित अवलंबून असणार आहे.
सध्या जिल्हा बँक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीची सुनावणी पूर्ण झाली आहे. या सुनावणीची मुदत 29 ऑक्टोबर पर्यंत मुदत आहे. 3 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. पण एकूण राजकीय घडामोडी पाहता जिल्हा बँकेची निवडणूक कधी लागेल ते सांगता येत नाही. पण गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचे नेते सावध भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे.