सिंहगडावरील दरवाजाच्या पायऱ्यांवर स्टंटबाजी करणाऱ्यांवर काय कारवाई? मोठी अपडेट समोर!
पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर पुणे दरवाजाच्या पायऱ्यांवर सायकलपटूंनी स्टंटबाजी केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे पर्यटकांच्या ये-जा करण्यावर परिणाम झाला. विनापरवाना आयोजनाच्या दाव्याची चौकशी आणि कारवाईची मागणी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या सिंहगड किल्ल्यावर सायकलपटूंनी पायऱ्यांवरून सायकल चालवत स्टंटबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे. रविवारी सकाळी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानस्थळापासून पुणे दरवाजापर्यंतच्या परिसरात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. या घटनेमुळे स्थानिक रहिवासी आणि गडावर आलेल्या शिवभक्तांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण आणि पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेता संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
बलिदानस्थळापासून पुणे दरवाजापर्यंत सायकल स्टंट
दहाहून अधिक सायकलपटू सिंहगड घाटरस्त्याने सायकली घेऊन किल्ल्याच्या वाहनतळावर पोहोचले. त्यानंतर सायकली गडावरील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानस्थळाच्या परिसरात नेण्यात आल्या. तेथून पुणे दरवाजाच्या पायऱ्यांवर सायकल चालवत खाली उतरण्याचे प्रकार सुरू होते. ऐतिहासिक किल्ल्यावरील पायऱ्या आणि संवेदनशील स्थळांचा अशा प्रकारे वापर झाल्याने नागरिकांनी आक्षेप घेतलाय.
पर्यटकांच्या ये-जा करण्यावर परिणाम
या स्टंटबाजीमुळे पुणे दरवाजातून ये-जा करणाऱ्या पर्यटकांना सुमारे अर्धा तास अडथळा निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. दरवाजाच्या वरच्या आणि खालच्या बाजूला पर्यटकांची गर्दी जमली होती. किल्ल्यावर लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबांसह येणारे पर्यटक मोठ्या संख्येने असतात. अशा ठिकाणी वेगाने सायकल चालवणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे मनोरंजन किंवा साहसी उपक्रमांच्या नावाखाली इतरांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी मागणी होत आहे.
स्पर्धेच्या आयोजनावरून प्रश्न
या उपक्रमाचे आयोजन माउंटन बाइकिंग सायकल रेसच्या नावाखाली करण्यात आल्याचा आरोप असून, गौतम तावडे यांनी विनापरवाना स्पर्धा आयोजित केल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.
स्थानिकांचा संताप; कारवाईची मागणी
सिंहगडावरील बलिदानस्थळ आणि ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरात अशा प्रकारांना परवानगी देऊ नये, अशी मागणी स्थानिक रहिवासी आणि शिवभक्तांकडून होत आहे. किल्ल्याच्या ऐतिहासिक महत्त्वासोबतच तेथील वास्तूंचे जतन करणे आवश्यक आहे. पायऱ्या आणि अरुंद प्रवेशद्वारांचा वापर स्टंटसाठी केल्यास पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित सायकलपटू आणि आयोजकांची चौकशी करून नियमांनुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पुरातत्त्व विभागाकडून कठोर कारवाईचा इशारा
स्थानिकांच्या तक्रारीनंतर पुरातत्त्व विभागाचे सहसंचालक डॉ. विलास वाहणे यांनी बेकायदा स्टंटबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितल्याची माहिती आहे. प्रत्यक्षात कोणती कारवाई करण्यात आली, गुन्हा दाखल झाला आहे का आणि स्पर्धेच्या आयोजकांना नोटीस बजावण्यात आली आहे का, याबद्दलची माहिती समोर आली नाही.