Pune pune lohagad ketan agrawal Case : पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाचा खटला कोर्टात सुरु झाला आहे. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनची हत्या केल्याचा आरोप केला. या प्रकरणी पोलिसांनी सिया, चेतन यांच्या सह त्याचा आणखी एक मित्र रितेश हंगे याला अटक केली आहे. या प्रकरणात सरकारी वकिल उज्वल निकम यांची निुक्ती करण्यात आली आहे. पहिल्याच सुनावणीत उज्वल निकम यांनी आरोपींना मोठा इशारा दिला आहे.
केतन अग्रवाल हत्याप्रकरणी पुढील सुनावणी 17 नोव्हेंबरला होणार आहे. सहआरोपी रितेश हांगे याला वकील उपलब्ध नसल्याने पुढील सुनावणी 17 नोव्हेंबरला होणार आहे. आजच्या सुनावणीला सिया आणि चेतन ऑनलाईन हजर होते. सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांकडून दोन जामीन अर्ज न्यायालयात सादर करण्यात आले. मात्र, सरकारी पक्षाला बाजू मांडण्याची संधी मिळेपर्यंत या जामीन अर्जांवर विचार करू नये, अशी मागणी उज्ज्वल निकम यांनी कोर्टाकडे केली.
सरकारी वकील उज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील तीनही आरोपी सियागोयल चेतन चौधरी आणि रितेश हंगे हे सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते. मात्र, या सुनावणी दरम्यान या तिघांच्याही चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचं पश्चाताप दिसून येत नव्हता. मात्र 17 नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणी दरम्यान या तिघांनाही समजेल की त्यांच्या विरोधातील नेमके कोणते कोणते पुरावे आहेत असा इशारा उज्वल निकम यांनी दिला.
केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात पोलिसांनी सिया आणि चेतन विरोधात दोघांविरोधात कोर्टात 5500 पानांचे आरोपत्र दाखल केले आहे. यात पोलिसांनी डिजीटल पुराव्यांचा उल्लेख केला आहे. 18 जून 2026 रोजी लोणावळा येथील लोहगडावरुन पडून केतन अग्रवाल याचा मृत्यू झाला. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनला लोहगडाच्या दरीत ढकलल्याचा पोलिसांचा आरोप आहे.