SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

गाव विक्रीला काढणाऱ्या तुळशी गावाचा भन्नाट उपक्रम, आता पाणी स्वयंपूर्णतेचा ‘तुळशी पॅटर्न’

महाराष्ट्र दुष्काळाच्या झळांनी होरपळतोय. माढा तालुक्यातील तुळशी गाव चक्क विकायला काढलं आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 02, 2026, 02:40 PM IST | Updated: Nov 02, 2026, 02:41 PM IST
Image Credit: Village for sale Maharashtra
Join

पाण्याच्या थेंबासाठी संघर्ष, पाण्याच्या टँकरवर अवलंबून असलेलं गाव आणि अखेर पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था होत नसल्याने थेट गावच विक्रीला काढण्याची वेळ ग्रामस्थांवर आली होती. मात्र, आता याच तुळशी गावाच्या मदतीला लोकमंगल समूह धावून आला आहे. कोणतीही आश्वासनं न देता थेट कामाला सुरुवात करत गावात जलसंधारणाचा नवा प्रयोग राबवला जात आहे. तब्बल 19 बंधाऱ्यांच्या माध्यमातून आकार घेतोय पाणी साठवणुकीचा ‘तुळशी पॅटर्न’

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी गाव. पावसाच्या पाण्याशिवाय गावाला दुसरा कोणताही शाश्वत जलस्रोत नाही. पाऊस पडला तर पाणी, अन्यथा टँकरच्या पाण्यावरच ग्रामस्थांना दिवस काढावे लागतात. पाणीटंचाईच्या या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी ग्रामस्थांनी अखेर आपलं गावच विक्रीला काढलं होतं. या घटनेने संपूर्ण राज्याचं लक्ष तुळशी गावाकडे वेधलं गेलं.

मात्र, गाव विक्रीला काढण्याच्या या आक्रोशानंतर आता तुळशी गावाच्या पाणीप्रश्नावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. लोकमंगल समूहाचे प्रमुख तथा माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी केवळ आश्वासनांवर न थांबता जलसंधारणाच्या कामांचा पुढाकार घेतला आहे.

लोकमंगल समूह आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून तुळशी गावाच्या परिसरात तब्बल 19 बंधारे उभारले जात आहेत. या बंधाऱ्यांसाठी सध्या सुमारे 35 फूट खोलीकरण करण्यात आलं आहे. एका बंधाऱ्यात अंदाजे 25 कोटी लिटर पाणी साठवण्याचं उद्दिष्ट आहे. या जलसाठ्यामुळे परिसरातील विहिरी आणि विंधन विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून तुळशी गावाला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचं आश्वासन दिलं आहे. हा पाणीस्रोत उपलब्ध झाल्यानंतर 19 बंधारे आणि गावातील दोन पाणी साठवण तलावांच्या माध्यमातून पाण्याचं नियोजन करण्याचा प्रयत्न आहे.

विशेष म्हणजे, केवळ सरकारी मदतीची वाट न पाहता लोकसहभाग आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने गावाच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे तुळशी गावाने सुरू केलेल्या या जलसंधारणाच्या उपक्रमाला इतर सामाजिक संस्थांनीही मदतीचा हात द्यावा, असं आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे

काही दिवसांपूर्वी ज्या गावाने पाण्यासाठी स्वतःलाच विक्रीला काढलं होतं, त्याच गावात आता पाण्याच्या स्वयंपूर्णतेसाठी 19 बंधाऱ्यांची उभारणी सुरू झाली आहे. गावाच्या एकजुटीला लोकसहभागाची जोड आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने उभा राहत असलेला हा जलसंधारणाचा प्रयोग भविष्यात इतर दुष्काळी गावांसाठीही दिशादर्शक ठरू शकतो

कारण गाव विक्रीला काढण्याची वेळ आणणारी पाणीटंचाई आता गावाच्या एकजुटीने दूर करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. म्हणूनच म्हणतात. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES