उल्हासनगरमधील जमिनींसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा! सिंधी समाजाला दिलासा; म्हणाले, 'नागपूरमधून...'
चांदीबाई हिम्मतमल मनसुखानी (सीएचएम) महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहरासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्हासनगरसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. उल्हासनगर येथील हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट (एचएसएनसी) संस्थेच्या चांदीबाई हिम्मतमल मनसुखानी (सीएचएम) महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी उल्हासनगरचा नवी मुंबईप्रमाणे नियोजित शहर म्हणजेच प्लॅन्ड सिटी म्हणून विकास केला जाईल असं सांगितलं आहे. यासाठी विशेष विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलं आहे. फडणवीस यांनी उल्हानगरमधील जमिनींसंदर्भातही एक मोठी घोषणा केली.
उल्हासनगर एकेकाळी देशातील पहिले...
आपल्या भाषणामध्ये फडणवीस यांनी, "उल्हासनगर हे एकेकाळी देशातील पहिले नियोजित शहर होते. मात्र, कालांतराने शहराचे स्वरूप बदलले. आता अनधिकृत घरे अधिकृत करण्यासह समूह विकास योजनेच्या माध्यमातून शहराच्या विकासाचा व्यापक आराखडा तयार करण्यात येईल. उल्हासनगरचा पुन्हा एकदा नियोजित शहराच्या धर्तीवर विकास केला जाईल," असे आश्वासन दिले. तसेच, त्यांनी स्थानिक सिंधी समाजाची एक दिर्घकालीन मागणीसंदर्भात अत्यंत महत्त्वाची घोषणा केली.
'तिसऱ्या मुंबई'अंतर्गत होणार उल्हासनगरचा विकास
उल्हासनगरचा तिसऱ्या मुंबईच्या संकल्पनेत समावेश करण्याची अपेक्षा असल्याच्या फडणवीसांसमोरच सांगण्यात आलं. आपल्या भाषणामध्ये त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी, "उल्हासनगरचा या संकल्पनेत आधीच समावेश करण्यात आला आहे. 2018 मध्ये केलेल्या घोषणेनुसार शहरात मेट्रो आणली असून, लवकरच उल्हासनगरला मेट्रोची जोडणी मिळेल. याशिवाय शहराला आधुनिक स्वरूप देण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते, उड्डाणपूल आणि स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची योजना अशा विविध विकासकामांना सरकारने मान्यता दिली आहे. ही कामे सुरू झाली असून, उल्हासनगरचा चेहरामोहरा वेगाने बदलत आहे," असं म्हटलं.
जमिनींसंदर्भात मोठी घोषणा
उल्हासनगर मधील सिंधी समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या जमिनींच्या मालकीसंदर्भात फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. सिंधी समाजाला त्यांच्या जमिनींच्या मालकी हक्काचे पट्टे देऊन त्या जमिनी 'फ्री होल्ड' करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाची सुरुवात नागपूरमधून झाली असून, लवकरच उल्हासनगरमध्येही त्याची अंमलबजावणी केली जाईल. हा निर्णय प्रत्यक्षात आणून दाखवू, असा शब्द फडणवीस यांनी दिला.
पदवीसोबत कौशल्य गरजेचं
सीएचएम महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे आणि स्मार्ट क्लासरूमचे कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी कौशल्य विकास का महत्त्वाचा आहे हे आपल्या भाषणात सांगितलं. पंतप्रधानांच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार ही आधुनिक आणि सर्वसमावेशक इमारत उभारण्यात आली आहे. केवळ पदवी मिळवण्याचा काळ आता संपला आहे. पदवीसोबत ज्ञान आणि कौशल्य नसेल, तर ती पदवी केवळ कागदाचा तुकडा ठरते, असं मत फडणवीसांनी व्यक्त केलं.