SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

जो महाराष्ट्र शिवरायांचंही ऐकणार नसेल त्याला परमेश्वराने वाचवावं; राज ठाकरेंचा संताप, 'पेटून उठा आणि...'

महाराष्ट्रातील आमदार खासदार करतात काय? इतके लाचार का झाले आहेत. एकजण बोलत नाही. सत्तेवर तुम्ही बसवलंत आणि ते पद जाईल म्हणून तुमच्याबद्दल बोलायला तयार होत नाहीत अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 28, 2026, 08:29 PM IST | Updated: Oct 28, 2026, 08:36 PM IST
Image Credit: महाराजांचे मावळे असल्याचं सांगायचं आणि पेटत नाही, राज ठाकरेंची खंत
Join

जो महाराष्ट्र शिवरायांचंही ऐकणार नसेल त्याला परमेश्वराने वाचवावं अशा शब्दांत मनसे अध्यक्ष ऱाज ठाकरेंनी मनातील खंत बोलून दाखली आहे. कर्जतमध्ये वृक्षतोडीविरोधात आयोजित 'सह्यादी जागा हो' जाहीर सभेत ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र यावेळी राज ठाकरेंनी वाचून दाखवलं ज्यामध्ये झाडांचा लेकरांप्रमाणे जपण्यास सांगितलं होतं. हे सांगताना ते म्हणाले, "त्यांचं तरी ऐकणार आहोत का आपण? जो महाराष्ट्र शिवरायांचंही ऐकणार नसेल त्याला परमेश्वराने वाचवावं. दुसरं कोणी वाचवू शकत नाही. या अन्यायाविरोधात लढता येत नसेल, ते आमचा प्रश्न सोडवतील, मोर्चे काढतील  असं वाटत असेल तर मग तुम्ही काय कऱणार आहात?".

ते कोयते काय फक्त फांद्या छाटायला आहेत

"स्वत: मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं की, केंद्राने आणि खासगी कंपनीने ठरवलं आणि त्यांनी प्रस्ताव दिल्यानंतर हे सुरु झालं. हे सगळं वरती ठरतं. हे उद्योगपती मोदी, शाहांना भेटतात आणि सांगतात आम्ही जमीन पाहिली आहे. गुजरातची ही दोन माणसं महाराष्ट्र चालवणार आणि तुमच्यावर हात जोडायची वेळ येते. तुमचे कोयते काय करतात? ते कोयते काय फक्त फांद्या छाटायला आहेत. जव्हार मोखाड्यातून माणसं आणत आहेत. त्यांना मला सांगायचं आहे की,  आज कर्जतच्या जंगलावर आली आहे उद्या तुमच्या दरवाजावर टकटक होणार. उद्या तुमच्यावरही वरवंटा फिरणार," अशी चेतावणी राज ठाकरेंनी दिली आहे.

हे ही वाचा - 'अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो पण... '; राज ठाकरेंनी कर्जतच्या सभेतून दिला जाहीर इशारा, 'गुजरातची दोन माणसं आमचा महाराष्ट्र...'

तुम्हाला अल्पमतात आणत आहेत

संपूर्ण सह्याद्रीच्या कुशीत 23 प्रकल्प येत आहेत. त्यातील काही बाहेरचे आहेत. तीन प्रकल्प केंद्र सरकारचे आहेत आणि बाकी 20 अदानी हायड्रो, मेघा इंजिनिअरिंग, जेएसडब्ल्यू, टाटा, अदानी, ग्रीनको यांचे आहेत सांगत त्यांनी यादीच वाचून दाखवली. हे सर्व खासगी प्रकल्प आहेत. मी पैसे टाकतो जंगल तोडून द्या, माणसं मारुन द्या सांगतात. 236 वीजनिमिर्तीचे प्रकल्प येत आहे. पुढील गोष्टींसाठी हे प्कल्प येत आहेत. कोळशावर चालणारे 40 प्रकल्प येत आहेत. कोणासाठी प्रकल्प येत आहेत? कोणासाठी, कशासाठी आणत आहेत? नीट गोष्टी पाहिल्या तर मतदारसंघ फोडत आहेत. तुम्हाला अल्पमतात आणत आहेत. तुम्ही कमी होणार आणि बाकीचे वाढणार. त्यासाठी वीज रस्ते हवेत. पण आम्ही बेसावध आहोत अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

महाराजांचे मावळे असल्याचं सांगायचं आणि पेटत नाही

"जगात काय सुरु आहे पाहा. नुकतंच तरुणांचं, विद्यार्थ्यांचं आदोलन झालं. एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. सर्बियात तरुण आणि विद्यार्थ्यांनी सत्ता पालटवलून टाकली. जेन झी हे फक्त मुंबई, दिल्लीत नाही तर ग्रामीण भागातही आहेत. तुम्ही कधी उठणार आहात? तिथेही हुकूमशाह होता. सगळी चॅनेल वर्तमानपत्र गुंडाळली होती, देशद्रोही ठरवलं जायचं. जे इथे सुरु आहे तेच तिथे सुरु होतं. पण त्या तरुणांनी सत्ता बदलली. आम्ही मात्र सहन करत आहोत. या आमच्यावर वरवंटा फिरवा. थंड शांत बसणार असाल तर मला तुमचं नेतृत्व करायचं नाही. मला परत यायचं नाही. महाराजांचे मावळे असल्याचं सांगायचं आणि पेटत नाही," असा संतापच त्यांनी व्यक्त केला.

"जितका विरोध होईल, त्यानतंर हे सरकार वीज बंद करेल. वीज बंद केल्यानंतर मग सरकार या प्रोजक्टची गरज किती आहे सांगेल. वीज कमी पडतीये, अंधार होतोय हे सगळं घडवून आणतील. मग यांच बरोबर आहे असं वाटेल. पण हे प्रकल्प दुसऱ्यांसाठी आहे. यांचं सर्वांचं लक्ष महाराष्ट्रावर आहे," असा इशारा त्यांनी दिला.

आज जंगलावर आहे, उद्या शहरांवर येणार

"गडचिरोलीत शेतीची जमीन, पिकं तोडली आणि खाणीला परवानगी दिली. मुंबईतही जमिनी देत आहेत . तुम्हाला विचारलंच जात नाही. ग्रामपंचायतीने जमीन विकायची नाही असा ठराव केला आहे, पण कोण विचारतंय तुम्हाला. निवडणुकीला तोंडावर पैसे फेकून आणि मत घेऊ ही हिंमत राज्यकर्त्यांना तुम्ही दिली आहे. कसलाही  विचार न करता जंगल तोडत आहेत. आज जंगलावर आहे, उद्या शहरांवर येणार," असाही दावा त्यांनी केला.

चुकीचे वागतात त्यांना तुम्ही सरळ केलं पाहिजे

"झाडं तोडल्यानंतर अनेक पक्षांची घरटी होती, ती त्या भागात फिरत होते. उद्या अशा घिरट्या घालायची वेल तुमच्यावर येणार. आमचं घऱ कुठे गेले. कॉलनी कुठे गेली. हीच मंडळी निघा सांगणार. या सगळ्या गोष्टींचा विचार मतदानावेळी करायचा असतो. त्यावेळी जर विसरलात तर या आंदोलनाचा, मोर्चाचा उपयोग काय? वेळ जात नव्हती म्हणून झाडं पाहायला गेलो का? पण हे आतमध्ये टोचच नाही तोपर्यंत काही होणार नाही. तरुणांनी मनात कोरुन ठेवा. जे चुकीचे वागतात त्यांना तुम्ही सरळ केलं पाहिजे," असं आवाहनच त्यांनी केलं. सर्बियात नेतृत्व नव्हतं, तुम्ही कोणत्या नेतृत्वाची वाट पाहात आहात. या आमदार, खासदारांकडून काही होणार नाही असंही ते म्हणाले. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES