ठाण्याला मुंबईशी जोडणाऱ्या मेट्रोच्या कामाला वेग, ठाण्यात वाहतुकीत बदल, असा असेल पर्यायी मार्ग
मुंबई मेट्रो मार्गिका 4 वर ट्रायल रन सुरू असून त्यामुळं वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
एमएमआरडीए सध्या वडाळा-घाटकोपर- कासारवडवली मेट्रो मार्गिका 4 ची चाचणी घेत आहेत. ही मार्गिका ठाण्याच्या मुलुंड चेक नाका येथून सुरू होऊन घोडबंदर रोडवरील गायमुख पर्यंत आहे. या प्रकल्पाने आता गती घेतली असून मुलुंड चेक नाका ते तीन हात नाका दरम्यान मेट्रो कोच रुळांवर ठेवण्याची तयारी सुरू आहे. हे काम येत्या दोन दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या दरम्यान परिसरात वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मुलुंड चेक नाका आणि तीन हात नाका दरम्यान रात्रीच्या वेळी वाहतूक वळवण्यात आली आहे.
मागील वर्षी सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गायमुख स्टेशनचा दौरा केला होता. त्यांनी मेट्रो 4 आणि मेट्रो 4A मार्गिकेच्या चाचणीचा आढावा घेतला होता. ही मेट्रो ठाणे शहराला मुंबईशी जोडते. गायमुख जंक्शन, गायमुख गाव, घोडबंदर रोड, कासारवडवली आणि विजय गार्डन येथे मेट्रोच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर मेट्रोची कामे रेंगाळल्यानंतर याबाबत चिंतादेखील व्यक्त करण्यात आली होती. एक वर्ष उलटून गेल्यानंतरही मेट्रो सेवा सुरू झाली नाहीये.
हा प्रकल्प आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. मेट्रोचे कोच यशस्वीपणे रुळांवर बसवण्यात आल्यास हा प्रकल्पा पूर्णत्वाच्या दिशेने पाऊल टाकतोय. ठाण्यातून दररोज लाखो नागरिक मुंबईसाठी प्रवास करतात. मध्य रेल्वेवर किंवा रस्ते मार्गाने मुंबई गाठतात. अशातच मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर नागरिक लोकलवर कमी अवलंबून राहतील. तसंच, वाहतूक कोंडींची समस्याही कमी होईल. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रशासन यावर्षी डिसेंबरमध्ये ठाण्यातील काही महत्त्वाच्या स्थानकांवर मेट्रो सेवा सुरू करण्याच्या दिशेने काम करत आहे.
मुलुंड चेक नाका ते तीन हाथ नाका दरम्यान मेट्रो कोच रुळांवर ठेवण्याचे काम वेगाने सुरू आहे. या कामासाठी या कामासाठी, मुलुंड चेक नाका परिसरातील भारत पेट्रोलियम पंपाजवळील रुळांवर मेट्रोचे डबे आणले जातील. एमएमआरडीएने या प्रक्रियेसाठी ठाणे वाहतूक पोलिसांकडे परवानगी मागितली होती, जी आता मंजूर झाली आहे. परिणामी, बुधवारपासून या मार्गावरील रात्रीच्या वाहतुकीच्या व्यवस्थेत बदल केला जाईल.
मुंबई आणि वागळे इस्टेटकडून (मार्ग क्रमांक 16 मार्गे) तीन हात नाका जंक्शनकडे जाणारी आणि मोडेला चेक नाक्यावरून जाणारी वाहने मुलुंड चेक नाका पॉईंटमध्ये प्रवेश करू शकणार नाहीत. या वाहनांसाठी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक अतिरिक्त मार्गिका तयार करण्यात आली असून, वाहतूक या पर्यायी मार्गावर वळवण्यात येईल.