रत्नागिरीत 25 एकरावर उभं राहतंय विमानतळ, एकाच वेळी 4 विमाने पार्क होणार; कुठं आहे लोकेशन? वाचा
रत्नागिरीत लवकरच विमानप्रवास सुरू होणार आहे. कुठे असेल विमानतळ, वाचा सर्वकाही
सिंधुदुर्गात विमानसेवा सुरू झाली आहे. त्यापाठोपाठ आता रत्नागिरी येथेही विमानतळाच्या हालचालींना वेग आला आहे. रत्नागिरी विमानतळाची टर्मिनल इमारतीचे काम पूर्ण झाले असून ती आता पूर्णपणे सज्ज आहे. येत्या जानेवारीपासून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येथून विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. तसे संकेतच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहेत.
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाची इमारतीसाठी 8 वर्ष लागले. मात्र रत्नागिरी विमानतळाची टर्मिनल इमारत फक्त 2 वर्षांत बांधून पूर्ण करण्यात आली आहे. चिपी विमानतळाच्या तुलनेत रत्नागिरीचे विमानतळ अधिक सुसज्य आणि सोयीस्कर असेल. हे विमानतळ जिल्हाधिकारी कार्यालयापासून फक्त 2 किमी अंतरावर असणार आहे.
रत्नागिरी विमानतळाच्या अंतर्गंत कामांनी सध्या वेग घेतला आहे. बहुतांश कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. संरक्षक भिंत आणि विजेची सर्व आवश्यक कामे 90 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहेत. सुमारे 25 एकर जागेवर तब्बल 100 कोटी रुपये खर्चून हा भव्य विमानतळ प्रकल्प पूर्ण होत आहे. तसंच, व्यावसायिक विमान उड्डाणांसाठी कोस्टगार्डच्या धावपट्टीचा वापर केला जाणार आहे.
रत्नागिरी विमानतळाची क्षमता 72 आसनी विमानांच्या उड्डाणासाठी योग्य असणार. तसंच, विमानतळावर एकाच वेळी 4 विमाने पार्क करण्याची क्षमता असेल. रत्नागिरी विमानतळ हे महाराष्ट्राच्या कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यातील मिरजोळे येथे स्थित आहे
197 कोटींच्या खर्चाला मान्यता
रत्नागिरी विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने 27 ऑगस्ट 2026 रोजी 197.05 कोटी रुपयांच्या तृतीय सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यतेला मंजुरी दिली आहे. या आराखड्यात भूसंपादनासाठी 66.22 कोटी, प्रवासी टर्मिनल इमारतीसाठी 55.56 कोटी, ॲप्रॉन, लिंक टॅक्सी वे आणि जोडरस्त्यांसाठी 31.62 कोटी, बीएसएनएल टॉवर स्थलांतरासाठी 2.26 कोटी, सुरक्षा व अतिरिक्त कामांसाठी 5.75 कोटी आणि अन्य तरतुदींचा समावेश आहे.
चिपी विमानतळ सुरू
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यातील थेट विमानसेवा 16 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. ही सेवा आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध असेल. त्यामुळे आता एक तास 10 मिनिटात आता थेट सिंधुदुर्गला पोहोचता येणार आहे. या विमानसेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, सर्व तिकिटे विकली गेल्याचे ‘फ्लाय ९१’च्या संकेतस्थळावर दिसत आहे.
नवी मुंबईहून सकाळी उड्डाण या मार्गावरील विमानांचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. नवी मुंबई ते सिंधुदुर्ग हे विमान सकाळी 7.55 वाजता उड्डाण घेईल, तर सकाळी 9.05 वाजता चिपी येथे पोहोचेल. तर सिंधुदुर्ग ते नवी मुंबई हे विमान सकाळी 9.25 वाजता निघून सकाळी साडेदहाच्या सुमारास नवी मुंबईत पोहोचेल.