कोकणात भीषण स्थिती, पावसाचा प्रदेश मानल्या जाणाऱ्या जिल्ह्याबाबत चिंता वाढली, भूजल पातळी तब्बल...
पावसाच्या परतीनंतर कोकणात हवेत गारवा अपेक्षित असताना यंदा रत्नागिरीकरांना भर मे महिन्यासारखा उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे.
जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना कोरडाच गेला. ऑक्टोबरमध्ये तर पहिल्या दिवसापासूनच उष्णतेचा तडाखा बसत आहे. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला आहे. पाण्याआभावी पिकं करपून गेली आहेत. तर जलाशयातील पाणीही आटत चालले आहे. पावसाचा प्रदेश मानल्या जाणाऱ्या कोकणातही भीषण परिस्थिती आहे.
पावसाचा प्रदेश मानल्या जाणाऱ्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने यंदा सप्टेंबरअखेरच भूजल पातळीत तब्बल 5.22 मीटरने मोठी घट झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या पाहणीनंतर शासनाने जिल्ह्यातील रत्नागिरी,संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून,विहिरींनी तळ गाठल्यामुळे आगामी काळात भीषण पाणीटंचाईसह आंबा-काजू बागायतदार आणि रब्बी पिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
उष्णतेच्या लाटेचा इशारा
रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला असून हवामान विभागाने आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.
उष्णतेची ही लाट कायम असतानाच,जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी चार तालुके दुष्काळग्रस्त घोषित
रत्नागिरी जिल्ह्यात ट्रिगर-2 नुसार आणखी चार तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. मंडणगड, दापोली, खेड आणि लांजा या तालुक्यांचा नव्याने समावेश झाला आहे. यापूर्वी रत्नागिरी, राजापूर आणि संगमेश्वर हे तीन तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले होते. त्यामुळे आता जिल्ह्यातील सात तालुक्यांचा समावेश झाला आहे. मात्र, चिपळूण आणि गुहागर तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीत स्थान मिळालेले नाही. पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, आर्थिक मदतीबाबत स्वतंत्र शासन निर्णय जाहीर होणार आहे.
रत्नागिरीत उष्णतेचा १४३ वर्षांचा विक्रम मोडला
यंदा रत्नागिरीकरांना भर मे महिन्यासारखा उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. काल रत्नागिरीत तब्बल 39.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून,ऑक्टोबर महिन्यातील गेल्या 143 वर्षांचा ऐतिहासिक विक्रम मोडीत निघाला आहे. अरबी समुद्रावरील वाऱ्यांमधील बदल आणि दमट हवामानामुळे नागरिक घामाघूम झाले असून,नागरिकांनी दुपारच्या वेळी काळजी घेण्याचे आणि मुबलक पाणी पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे.