रोजचा 34 किलोमीटरचा फेरा टळणार? 'ते' पत्र मिळताच CM फडणवीस Action मोडमध्ये; 32 ठिकाणच्या स्थानिकांना मिळणार दिलासा
समृद्धी महामार्गासंदर्भातील एक महत्त्वाच्या तांत्रिक अडचणीबद्दल पत्र मिळाल्यानंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आहे. नेमकं हे प्रकरण काय समजून घ्या...
समृद्धी महामार्ग हा विकासाचा महामार्ग असल्याचं शासनाकडून सांगितलं जातं. एकूण 701 किलोमीटर लांबीच्या या मार्गामुळे अनेक गावांना उत्तम कनेक्टीव्हिटी मिळाली आहे. मात्र मुंबईमध्ये हा मार्ग ज्या ठिकाणी कनेक्ट करण्यात आला आहे तिथून काही अंतरावर एक वेगळीच समस्या स्थानिकांना जाणवत असून यासाठी आता एक दोन नाही तर तब्बल 32 गावांनी एकत्र येत हलचाल सुरु केली आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: यामध्ये लक्ष घातलं असून खरोखरच ही समस्या सोडवली गेली तर स्थानिकांचा 34 किलोमीटरचा फेरफटका वाचणार आहे. नेमका हा सारा प्रकार काय जाणून घेऊयात...
कुठे आणि काय समस्या आहे?
कल्याण तालुक्यातील निंबवली येथे समृद्धी महामार्गाचा टोल प्लाझा आहे, मात्र तिथे एन्ट्री-एक्झिटची सुविधा नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांना महामार्गावर चढण्यासाठी 17 किलोमीटर पुढे जाऊन 17 किलोमीटर परत यावे लागते. तब्बल 34 किलोमीटरचा अतिरिक्त फेरा, वेळ, इंधन आणि पैसा वाया जातो.
स्थानिक आमदाराचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
ही अडचण लक्षात घेऊन मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी 28 जुलै 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले. टिटवाळा महागणपती मंदिर हे तीर्थक्षेत्र आणि खडवली पर्यटन स्थळ या परिसरात असून एन्ट्री-एक्झिट नसल्याने भाविक, पर्यटक, विद्यार्थी आणि प्रवाशांना किमान 20 किलोमीटरचा फेरा मारावा लागत असल्याचे पत्रात नमूद केले होते.
थेट मुख्यमंत्र्यांकडून आदेश
या पत्राची दखल घेत उपमुख्यमंत्री यांनी हे प्रकरण तपासून सादर करावे, असे निर्देश दिले. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने 30 सप्टेंबर 2026 रोजी एमएसआरडीसीला पत्र पाठवून उचित कार्यवाही करून त्याची माहिती आमदार कथोरे यांना देण्याची विनंती केली आहे. या मागणीला समृद्धी महामार्ग स्थानिक हक्क कृती समिती आणि 32 गावांतील ग्रामपंचायतींनी एकमताने ठराव मंजूर करून पाठिंबा दिला आहे.
32 गावातील लोकांना दिलासा
निंबवली-मोस, गुरवली, फळेगाव, सांगोडे-कोंढेरी, उतणे-चिंचवली, राया-ओझर्ली यासह परिसरातील गावांचा यात समावेश आहे. अनिल केणे आणि साईनाथ जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने 32 गावातील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दोन ठिकाणं फारच जवळ
निंबवलीपासून टिटवाळा महागणपती मंदिर केवळ 7 किलोमीटरवर, तर खडवली परिसरातील पर्यटनस्थळे केवळ 3 किलोमीटरवर आहेत. त्यामुळे येथे एन्ट्री-एक्झिट मिळाल्यास धार्मिक आणि ग्रामीण पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
नेमक्या मागण्या काय?
समितीच्या प्रमुख मागण्यांमध्ये निंबवली टोल प्लाझा परिसरात एन्ट्री-एक्झिट तातडीने मंजूर करा, स्थानिक गावांना जोडणारे सर्व्हिस रोड, अंडरपास किंवा ओव्हरब्रिज उभारा, आणि आमदारांच्या अध्यक्षतेखाली एमएसआरडीसी अधिकारी व स्थानिक प्रतिनिधींची संयुक्त बैठक घ्या. ही मागणी कोणत्याही पक्षाची नसून 32 गावांतील नागरिकांच्या न्याय्य हक्काची आहे, असे समितीने स्पष्ट केले आहे. आता एमएसआरडीसी यावर काय कार्यवाही करते, याकडे निंबवलीसह संपूर्ण कल्याण ग्रामीणचे लक्ष लागले आहे.