दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त 18,000 स्पेशल ट्रेन; रेल्वे स्थानकांवर महाभयानक गर्दी
दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त 18,000 स्पेशल ट्रेन धावणार आहेत. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता ही घोषणा करण्यात आली आहे.
Festival Season Special Trains : दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त रेल्वेने 18,000 स्पेशल ट्रेनची मोठी घोषणा केली आहे. दिवाळी आणि छठ पूजेनिमित्ताने अनेक जण आपल्या गावी जात आहेत. प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन, रेल्वेने दिल्लीतील स्थानकांवर सुरक्षेत वाढ केली आहे. व्यवस्थापनतही बदल करण्यात आले आहेत. या दरम्यान दिल्लीच्या रेल्वे स्थानकांवरून दररोज 8 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतील अशी अपेक्षा आहे. गर्दीचे सुरक्षितपणे व्यवस्थापन करण्यासाठी देशभरात विक्रमी 18,000 विशेष ट्रेन चालवल्या जात आहेत. सुरक्षेसाठी तनवी दिल्ली रेल्वे स्थानकावर 700 हून अधिक अत्याधुनिक एआय-आधारित कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
दिवाळी आणि छठ महापर्वामुळे दिल्ली-एनसीआरच्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने स्थलांतरित मजूर, विद्यार्थी आणि कामगार सणांसाठी आपापल्या घरी जात आहेत. यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
विशेषतः बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पूर्व भारताकडे जाणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांची संख्या खूप जास्त आहे. नवी दिल्ली, आनंद विहार, जुनी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे.
सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री थांबवली
रेल्वे स्थानकांवर होणारी प्रवाशांची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी, उत्तर रेल्वेने 3 ते 14 नोव्हेंबर दरम्यान दिल्ली-एनसीआरमधील सहा प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट विक्री बंद केली आहे. यामध्ये नवी दिल्ली, ओल्ड दिल्ली, आनंद विहार टर्मिनल, हजरत निजामुद्दीन, गाझियाबाद आणि दिल्ली सराय रोहिल्ला स्थानकांचा समावेश आहे.
अतिरिक्त तिकीट काउंटरची तरतूद
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा कक्ष तयार करण्यात आले आहेत. आरक्षित आणि अनारक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. आनंद विहार टर्मिनलवरही प्रवाशांना पद्धतशीरपणे प्लॅटफॉर्मवर पोहोचवले जात आहे. अतिरिक्त तिकीट काउंटर, बसण्याची सोय, पिण्याचे पाणी आणि खानपान सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
सुरक्षेसाठी 1300 अतिरिक्त सैनिक तैनात
प्रवाशांची सुरक्षा आणि गर्दीचे व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी, उत्तर रेल्वेने प्रमुख स्थानकांवर 1,300 अतिरिक्त रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) जवान तैनात केले आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर 700 हून अधिक एआय-आधारित कॅमेऱ्यांच्या साहाय्याने निगराणी ठेवली जात आहे.